Mysterious Sounds: एलियन्स साधत आहे पृथ्वीशी संपर्क? तज्ज्ञांनी बाह्य अवकाशातून रेकॉर्ड केले 25 रहस्यमय आवाज
Aliens | (Photo Credit: Archived, edited, representative images)

एलियन्सच्या (Aliens) शोधाबाबत अनेक प्रयत्न आणि दावे केले गेले आहेत. एलियन्सचे जग कोठे आहे हे शोधण्यात अनेक तज्ञ अनेक वर्षांपासून गुंतले आहेत. अशात येत्या काही वर्षांमध्ये शास्त्रज्ञ आणि एलियन यांच्यात संपर्क प्रस्थापित झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमला असा विश्वास आहे की एलियन्स 2029 पर्यंत पृथ्वीशी संपर्क साधू शकतात.

शास्त्रज्ञ अंतराळात विविध ठिकाणी एलियन्सचा शोध घेत आहेत. परंतु आतापर्यंत याबाबत फक्त अंदाज वर्तवले गेले आहेत. अनेक तज्ज्ञांनी काही व्हिडिओ आणि फुटेजच्या आधारे परग्रहवासीयांबाबतचा तपास सुरु ठेवला आहे. असे अनेक व्हिडिओ आणि पुरावे सोशल मीडियावर समोर येत आहेत, जे एलियन्सचे जग दर्शवतात. परंतु याबाबत अजूनतरी काही स्पष्ट नाही.

आता काही अंतराळ तज्ज्ञांनी सांगितले की, त्यांच्या मशीनमध्ये बाह्य अवकाशातील काही आवाज कैद झाले आहेत. हे आवाज आकाशगंगेच्या कोणत्या कोपऱ्यातून येत आहे, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार हे आवाज एलियनचे असू शकतात असे सांगितले गेले आहे. एलियन बहुधा पृथ्वीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचे हे आवाज असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तज्ज्ञांनी आतापर्यंत अंतराळातून असे सुमारे पंचवीस गूढ आवाज शोधले आहेत. हे आवाज रेडिओ स्फोटाच्या आवाजापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, यामुळे त्यांचा एलियनशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. कॅनडाच्या हायड्रोजन इंटेन्सिटी मॅपिंग प्रयोगाच्या रेडिओ दुर्बिणीत मशीनमध्ये हे आवाज टिपले गेले आहेत. हे सर्व 25 रेकॉर्डिंग 2019 ते 2021 दरम्यान कॅप्चर करण्यात आले आहेत. सहसा ही यंत्रे रेडिओ स्फोटांचे आवाज पकडतात व या रेडिओ स्फोटांचे आवाज हे आकाशगंगेतील तुटणाऱ्या ताऱ्यांमधून येणारे आवाज असतात. पण यावेळी टिपलेले आवाज पूर्णपणे वेगळे आहेत. यामुळे हे आवाज एलियनचे असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. (हेही वाचा: चंद्राच्या मातीतून तयार करता येणार ऑक्सिजन? NASA च्या शास्त्रज्ञांना सापडला मार्ग, मानववस्तीचे स्वप्न होऊ शकते पूर्ण)

जेव्हा रेडिओच्या स्फोटाचा आवाज रेकॉर्ड केला जातो तेव्हा प्रत्येक वेळी त्याचे वेगवेगळे सिग्नल मिळतात. प्रत्येक वेळी तारा तुटल्यावर त्याचा आवाज वेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड केला जातो. पण यावेळी गेल्या तीन वर्षांत रेकॉर्ड केलेला आवाज पूर्वीपेक्षा वेगळे आहेत. यावेळी सर्व 25 रेकॉर्डिंग सारख्याच आहेत, म्हणजेच हे आवाज तारा तुटल्याचे आवाज नाहीत. एकसारखा आवाज येण्याचे कारण म्हणजे हे आवाज अथवा सिग्नल एलियन्स पाठवत असावेत असे तज्ञ मानतात. टोरंटो विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांच्या मते हे सर्व आवाज एकाच ठिकाणाहून येत आहेत. सध्या, तज्ञ या आवाजांबद्दल खूप उत्सुक आहेत आणि त्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.