Liquid Ocean Discovered on Mars: मानवासाठी मंगळ (Mars) ग्रह नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अहवालानुसार मंगळावर एकेकाळी नद्या आणि समुद्र होते, कालांतराने ते संपुष्टात आले. पण आता एका नवीन अभ्यासात मंगळ ग्रहाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे, ज्याद्वारे मंगळावरील महासागर पुन्हा भरले जाऊ शकतात. मंगळाच्या पृष्ठभागाखाली द्रव पाण्याचा मोठा साठा लपलेला असू शकतो, असे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. हा शोध नासाच्या इनसाइट लँडरच्या डेटावर आधारित आहे. हा अभ्यास सूचित करतो की, मंगळावर भूतकाळात किंवा वर्तमानकाळात सूक्ष्मजीव जीवनासाठी अनुकूल परिस्थिती असू शकते.
नासाचे इनसाइट लँडर 2018 पासून ते 2022 मध्ये त्याचे मिशन संपेपर्यंत, पृथ्वीवर डेटा पाठवत राहिले. याने मंगळावरील भूकंपाचा डेटा प्रदान केला होता, ज्यामुळे शास्त्रज्ञांना या संभाव्य पाण्याचा साठा शोधण्यात मदत झाली. आपल्या मोहिमेदरम्यान लँडरने मंगळावर 1,319 पेक्षा जास्त भूकंप नोंदवले. पाणी पृष्ठभागाच्या अंदाजे 11-20 किमी खाली स्थित आहे. अभ्यासात म्हटले आहे की, सध्याच्या मंगळावरील तापमान हे मधल्या थराच्या वरच्या बाजूला द्रव पाणी राहण्यासाठी पुरेसे उबदार आहे.
सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञ वाशन राइट यांनी सांगितले की, सध्याच्या मंगळावरील पृष्ठभागाखाली पाण्याची उपस्थिती ही भूकंपाच्या लहरींच्या गतीचे विश्लेषण करून निश्चित करण्यात आली आहे. खडकांची रचना, भेगा आणि त्या भरणाऱ्या गोष्टींवर अवलंबून या लहरी वेग बदलतात. म्हणजेच या भूकंप लहरींच्या वेगावर आधारित शास्त्रज्ञ अंदाज बांधतात. या खडकांमधील भेगांमधून सर्व पाणी बाहेर काढले तर, ते 1-2 किलोमीटर खोल जागतिक महासागर भरू शकेल.
अशा विशाल भूगर्भातील पाण्याच्या साठ्याचा शोध मंगळाच्या इतिहासाबद्दल आणि जीवनाला आधार देण्याची क्षमता याबद्दलची आपली समज वाढवतो. साधारण 3 अब्ज वर्षांपूर्वी, मंगळ हा नद्या, तलाव आणि शक्यतो महासागर असलेला एक उष्ण ग्रह होता. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, अंतराळात जाण्याऐवजी पाणी मुख्यतः जमिनीत मुरले. कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे सह-लेखक मायकेल मंगा म्हणाले की, पृथ्वीच्या भूजल प्रक्रियेप्रमाणेच मंगळावरही पाणी पृष्ठभागावर जाऊ शकते. मंगळावरील पाण्याच्या या ऐतिहासिक हालचालीवरून असे दिसून येते की, मंगळ ग्रह पहिल्यापासून पाण्याने भरलेला असावा.