Dragon Man (Photo Credit : Twitter)

शुक्रवारी मानवजातीबद्दल शास्त्रज्ञांनी मोठा खुलासा केला आहे. चीनमधील (China) संशोधकांनी अशी प्राचीन कवटी (Human Skull) जगासमोर सादर केली आहे, जी मानवाच्या पूर्णपणे नवीन प्रजातीची (New Human Species) असू शकते. ‘ड्रॅगन मॅन’ (Dragon Man) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवांची ही प्रजाती साधारण एक लाख 46 हजार वर्षांपूर्वी पूर्व आशियात राहत होती. ही कवटी उत्तर-पूर्व चीनमधील हार्बिनमध्ये 1933 मध्ये सापडली होती. परंतु ती इतकी वर्षे लपवून ठेवली गेली होती व अलीकडेच शास्त्रज्ञांचे लक्ष याकडे गेले. आतापर्यंत सापडलेल्या कोट्यवधी वर्षांच्या जीवाश्म अवशेषांपैकी हा सर्वात महत्वाचा मानला जाऊ शकतो.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे रिसर्च लीडर प्रोफेसर ख्रिस स्ट्रिंगर यांचे म्हणणे आहे की मागील 50 वर्षातील हा सर्वात मोठा शोध आहे. ते म्हणाले की, ही मानवांची अशी एक मालिका आहे जी आपल्यासारख्या प्रजाती, होमो सेपियन्सप्रमाणे विकसित झाली नाही. ही प्रजाती पृथ्वीवर शेकडो हजार वर्षे जगली आणि नंतर ती पूर्णपणे नामशेष झाली. संशोधकांचा असा विश्वास आहे की या शोधामुळे मानवी उत्क्रांतीचा क्रम नव्याने समजू शकतो.

त्यांच्या विश्लेषणानुसार, ही प्रजाती निअँडरथल मानवांपेक्षा आपल्या जवळची आहे. संशोधकांनी या मानवी प्रजातीला एक नवीन नाव दिले आहे, ते म्हणजे ‘होमो लोंगी’ (Homo Longi). चिनी भाषेत ड्रॅगनला 'लोंग’ म्हणतात. ड्रॅगन मॅनचा डोळ्यांच्या खोबण्या सामान्यपेक्षा थोड्या मोठ्या आहेत. डोळ्याचा भाग देखील जवळजवळ चौरस आहे. यांचे तोंड मोठे असून दातही मोठे आहेत.

चिनी संशोधक प्रोफेसर किआंग जी यांच्या मते ही कवटी प्राचीन आणि आधुनिक प्रकारच्या मनुष्यांचे मिश्रण आहे आणि यामुळे आतापर्यंत सापडलेल्या इतर मानवी प्रजातींपेक्षा ती वेगळी आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ड्रॅगन मॅन शक्तिशाली आणि आक्रमक असावा. ही कवटी एका 50 वर्षीय पुरुषाची असण्याची शक्यता आहे.