Elon Musk (Photo Credits: Getty Images)

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला इंक (Tesla Inc) आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) वातावरणातील वाढत्या कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन उत्सर्जनावर (Carbon Dioxide Emissions) काही ठोस उपाय शोधत आहेत. यासाठी त्यांनी कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करणार्‍या कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानास चालना देण्यासाठी 100 दशलक्ष (730 कोटी रुपये) चे बक्षीस जाहीर केले आहे. सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान तयार करणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस देण्यात येणार आहे. एलोन मस्क यांना असे तंत्रज्ञान विकसित करायचे आहे जे हवेमध्ये असलेले कार्बन कमी करू शकेल.

आतापर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत, परंतु पर्यावरणात पोहोचलेले कार्बन काढून टाकण्याचे प्रयत्न झाले नाहीत. आता मस्क कार्बन कॅप्चरिंग तंत्रज्ञानाच्या शोधात आहेत, जे वातावरणात असलेले कार्बन नियंत्रित करू शकेल. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हवामानातील बदल रोखण्यासाठीच्या अनेक योजनांचा प्लॅनेट-वार्मिंग उत्सर्जन कमी करणे हा महत्वाचा भाग होत आहे. परंतु कार्बनला हवेतून काढून टाकण्याऐवजी त्याचे उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्याऱ्या तंत्रज्ञानामध्ये आजपर्यंत फारशी प्रगती झालेली नाही.

आता मस्क यांनी गुरुवारी सोशल मीडियावर ट्विटद्वारे जाहीर केले की, ‘कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाला मी 100 दशलक्ष डॉलर्स दान देणार आहे.’ दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. एलोन मस्क पर्यावरणामधील वाढत्या प्रदूषणाबद्दल चिंतेत आहेत ते कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा: Bill Gates बनले अमेरिकेमधील सर्वात जास्त शेत जमिनीचे मालक; 18 राज्यांत खरेदी केली तब्बल 2 लाख 42 हजार जमीन)

दरम्यान, एलोन मस्क यांनी बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांनी सुरू केलेली योजना, 'द गिव्हिंग प्लेज' वर 2012 मध्ये स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत स्वाक्षरीकर्त्यास त्याच्या आयुष्यात त्याच्या मालमत्तेपैकी कमीतकमी अर्धी रक्कम दान करावी लागेल. हे दान प्रामुख्याने विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षण, ऊर्जा संशोधन, बालरोग संशोधन आणि मानवी अंतराळ संशोधन संशोधन यासारख्या क्षेत्रात वापरले जाते.