
यंदा होळीच्या पौर्णिमेला म्हणजेच 14 मार्चला आकाशात चंद्र ग्रहण (Total Lunar Eclipse) आहे.या वेळी चंद्र लालबुंद होणार आहे. खगोलीय विश्वात या चंद्राला 'ब्लड मून' (Blood Moon) म्हटलं जातं. चंद्रग्रहणाच्या वेळेस चंद्राचा रंग लालसर दिसण्याचा हा नजारा क्वचितच पहायला मिळतो. त्यामुळे त्याची उत्सुकता अधिक आहे. हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दिवसा असल्याने 'ब्लड मून' थेट पाहण्याची भारतीयांची संधी हुकणार आहे. 14 मार्च चं चंद्रग्रहण अमेरिका, पश्चिम यूरोप, पश्चिम आफ्रिका, नॉर्थ आणि साऊथ अटलांटिक ओशन भागातून दिसेल.भारतातून ग्रहण किंवा ब्लड मून दिसणार नसला तरीही ऑनलाईन माध्यमातून खगोलप्रेमी हा अदभूत नजारा पाहू शकणार आहेत.
ब्लड मून म्हणजे नेमकं काय?
"ब्लड मून" हा शब्द पूर्ण चंद्र ग्रहणाला सूचित करतो. या ग्रहणामध्ये चंद्र संपूर्ण ग्रहणादरम्यान लालसर रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून अपवर्तित होतो आणि चंद्रावर पडतो त्यामुळे चंद्राचा रंग लालसर दिसतो.निळा आणि जांभळा यासारख्या कमी तरंगलांबी असलेल्या प्रकाशाचे विखुरणे जास्त असते, तर लाल आणि नारिंगी सारख्या जास्त तरंगलांबी असलेल्या प्रकाशाचे वर्चस्व असते, ज्यामुळे चंद्राला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण लालसर रंग मिळतो.
चंद्र ग्रहणाची वेळ
चंद्र ग्रहण १३ मार्च २०२५ रोजी रात्री ११:५७ वाजता सुरू होईल आणि १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ६:०० वाजता संपेल.ग्रहणाचा सर्वात दृश्यमान टप्पा भारतीय वेळेनुसार पहाटे २:२६ ते पहाटे ३:३१ दरम्यान असणार आहे.
चंद्रग्रहण/ ब्लड मून लाईव्ह कुठे पहाल?
भारतातील खगोलप्रेमींना हा ब्लड मूनचा नजारा डिजिटल माध्यमातून पाहता येणार आहे. NASA, Time and Date Website इथे ब्लड मून आणि ग्रहणाची स्थिती यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. त्यामुळे त्याच्या माध्यामातून ब्लड मून पाहता येणार आहे.
भारतातून पूर्ण चंद्र ग्रहण पाहण्यासाठी सप्टेंबर 2025 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. 7-8 सप्टेंबरला भारतीयांना चंद्रग्रहण पाहता येणार आहे.