TRAI चा नवा नियम; मोबाईल सिमप्रमाणे टीव्हीच्या set top box मधील कार्डही पोर्ट करता येणार
Representational Image (Photo Credits: Twitter)

मोबाईल सिमकार्डप्रमाणे आता आपण सेट टॉप बॉक्समधील कार्डही बदलू शकतो. हा नवा नियम लवकरच लागू करणार असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दिली आहे.

केबल नेटवर्क ऑपरेटर चांगल्या सुविधा देत नसल्यास किंवा कंपनीच्या काही गोष्टी पटत नसल्यास आपण सेट टॉप बॉक्समधील कार्ड बदलून दुसऱ्या कंपनीचे कार्ड वापरु शकतो. वर्षाअखेरपर्यंत या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ट्रायने घेतला आहे. (केबल टीव्हीसाठी TRAI चे नवे नियम: कसे निवडाल स्वस्त आणि मस्त चॅनल्स पॅक्स?)

ट्रायच्या या नव्या नियमामुळे डीटीएच कंपन्या, केबल ऑपरेटर्सच्या मनमानी कारभाराला आळा बसेल. मात्र डीटीएच कंपन्या आणि केबल सेवा पुरवणाऱ्यांकडून या नियमाचा तीव्र विरोध केला जात आहे.

त्याचबरोबर प्रत्येक कंपनीचा सेट टॉप बॉक्स वेगळा असून त्यात टेक्निकल फरक आहे. त्यामुळे कार्ड बदलल्यास तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता कंपन्यानी वर्तवली आहे. प्रत्येक कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असल्याने एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधून दुसऱ्या कंपनीची सेवा पुरवणे अवघड होईल. तसंच यामुळे कंपन्यांची माहिती धोक्यात येऊ शकते, असे डीटीएच कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र यावर ट्राय लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.