ऑनलाईन व्यवहार करणे झाले सोपे; OTP ची कटकट, पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही, जाणून घ्या प्रक्रिया
मास्टरकार्ड (Photo Credit : Youtube)

मास्टरकार्डने (Mastercard) मंगळवारी आयडेंटिटी चेक एक्सप्रेस  (Identity Check Express) फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. मोबाईलवरील हा पहिला आणि पुढचा पिढीचा उपाय आहे, जो लाखो भारतीय ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंगचा वेगळा अनुभव देईल. भारतात प्रथमच झालेल्या ग्लोबल मास्टरकार्ड सायबर सिक्युरिटी समिटमध्ये आयडेंटिटी चेक एक्सप्रेसला प्रदर्शित केले गेले. आयडेंटिटी चेक एक्सप्रेसद्वारे, कार्डधारक 2000 रुपयांपेक्षाचे कमी व्यवहार अतिशय सोप्या रीतीने करू शकणार आहेत. या सिस्टीमचा अजून एक फायदा म्हणजे, वापरकर्त्यांना वन-टाइम संकेतशब्दाशिवाय (OTP) ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत.

2000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी ग्राहकांना एक वेगळा ट्रान्झॅक्शन पिन तयार करता येऊ शकणार आहे. तुम्ही ओटीपीऐवजी या पिनचा वापर करू शकता. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की व्यवहार करण्याच्या लांब प्रक्रियेमुळे आणि यासाठी सतत पृष्ठ पुनर्निर्देशनामुळे 20 टक्के वापरकर्ते व्यवहार मध्यावरच सोडतात. हीच गोष्ट टाळण्यासाठी कंपनी नवी प्रक्रिया अमलात आणणार आहे. (हेही वाचा: Mastercard भारतात करणार 1 बिलीयन डॉलरची गुंतवणूक; पुण्यात उभा राहणार महत्वाचा प्रकल्प)

आयडेंटिटी चेक एक्सप्रेस या सुविधेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे. या प्रोग्राम साठी नोंदणी झाल्यानंतर, आयडेंटिटी चेक साठी एक अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल .त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑलनाइन शॉपिंग साइट वर शॉपिंग कराल तेव्हा तुम्हाला पेमेंट साठी आपला चेहरा किंवा बोट दाखवावे लागेल. अशाप्रकारे ओटीपी किंवा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.