मास्टरकार्ड (Photo Credit : Youtube)

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे व्यापाराचा दृष्टीने फार महत्वाचे स्थान निर्माण झाले आहे. विविध मुलभूत गोष्टींच्या उपलब्धतेमुळे, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमुळे भारतात बाहेरील अनेक कंपन्या गुंतवणूक करता आहेत. पेमेंट कंपनी मास्टरकार्ड (Mastercard) ने येत्या पाच वर्षांमध्ये, भारतात तब्बल 1 बिलीयन डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. व्यवसायाचा विस्तार हे यामागील मुख्य ध्येय आहे. यातील 300 मिलियन डॉलरची गुंतवणूक ही भारताला मास्टरकार्डच्या जगातील तंत्रज्ञान नेटवर्कचा एक महत्वाचा भाग बनवण्यासाठी केली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले, ‘5 वर्षांपूर्वी फक्त 30 लोकांसह आम्ही भारतात गुंतवणूक केली होती, मात्र आता आमच्या जागतिक व्यवसायापैकी 14 टक्के व्यवसाय भारतात आहे. आता पुन्हा एकदा आम्ही पुणे व वडोदरामधील आमच्या तंत्रज्ञान केंद्रांद्वारे भारतात महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान क्षमता विकसित करीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’

मास्टरकार्ड 350 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक एका  पेमेंट प्रोसेसिंग सेंटरमध्ये करणार आहे. मास्टरकार्डचे हे सेंटर अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठे पेमेंट प्रोसेसिंग सेंटर राहणार असून, त्याद्वारे 1000 व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. हे सेंटर पुण्यात सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. (हेही वाचा: भारतामध्ये निर्माण होणार रोजगाराच्या नव्या संधी?; अमेरिकेच्या चीनमधील 200 कंपन्या येणार भारतात)

मास्टरकार्डचा अमेरिकेनंतर सर्वात जास्त व्यवसाय भारतात आहे, त्यामुळे परत भारतात गुंतवणूक करणे कंपनीच्या फायद्याचे आहे. कंपनी पुण्यात जे सेंटर उभा करणार आहे, त्यामध्ये  एटीएम कार्ड, प्रीपेड कार्ड व पॉइंट आॅफ सेल (कार्ड स्वॅपिंग) मशिन्सचे सर्व व्यवहार, कार्डच्या बाबतीत होणारी फसवणूक, गुन्हे अशा गोष्टी हाताळल्या जाणार आहेत.