नवीन वर्षांत JIO ची अनोखी सर्व्हिस; आता नेटवर्क नसतानाही कॉल करणे होणार शक्य
Jio (Photo Credit: PTI)

मोबाईल आणि इंटरनेट विश्वात जिओ (JIO) ने पाऊल ठेऊन एक नवीन क्रांती केली. त्यानंतर सामान्यांना परवडतील अशा दरात विविध प्लान्स उपलब्ध करून देऊन, जिओने बरेच मार्केट काबीज केले. रिलायन्स जिओ येत्या 2019 मध्ये GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार आहे. याचसोबत अजून एक नवीन सर्विस जिओ घेऊन येणार आहे, ती म्हणजे VoWi-Fi. या सर्व्हिसमुळे आता ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.  सध्या या सर्व्हिसची चाचणी चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये ही चाचणी यशस्वी झाली असून, लवकरच ही सेवा देशातील इतर भागात सुरु होईल.

जिओच्या या नव्या अनोख्या सुविधेमुळे आता नेटवर्क नसतानाही कॉल करणे शक्य होणार आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये ग्राहक या सेवेचा उपयोग करू शकतील. सध्यातरी ही सुविधा फक्त जिओ टू जिओ नंबरसाठीच उपलब्ध असणार आहे. त्त्यानंतर पुढे इतर नेटवर्कसाठी ही सुविधा उपलब्ध होईल.

देशातील ग्रामीण भागात नेहमी नेटवर्कची समस्या उद्भवते. मात्र आता वायफायद्वारे कॉलिंग करता येणार असल्याने, या भागातील लोकांना त्याचा विशेष फायदा होणार आहे. इतर काही देशांमध्ये वोडाफोनने ही सुविधा सुरु केली आहे. मात्र भारतामध्ये जिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच हा प्रयोग घडणार आहे.

यासोबत नवीन वर्षांत जिओ दोन महत्वाच्या सेवा घेऊन येणार आहे.  GigaFiber ही एक सुविधा असून, याद्वारे ग्राहकांना हाय स्पीड ब्रॉडबँडचा उपभोग घेता येईल. यासह रिलायन्स जिओने स्पेक्ट्रम वाटपाच्या सहा महिन्याच्या आत 5 जी सर्व्हिस लाँच करण्याचा प्लॅन केल्याचे समजते.