
इन्फोसिसने (Infosys) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ (Salary Hikes) जाहीर केली आहे, परंतु ही वाढ मागील वर्षांपेक्षा कमी आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. आयटी फर्मने कर्मचाऱ्यांना पगार सुधारणा पत्रे पाठवली, ज्यामध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या रेटिंगनुसार 5% ते 8 % पर्यंत पगारवाढ देण्याची ऑफर देण्यात आली. ही वाढ जूनियर ते वरिष्ठ पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. उच्च कामगिरी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकी वाढ मिळाली आहे. टायटल होल्डर्ससाठी (असोसिएट व्हीपी, एसव्हीपी, ईव्हीपी) वेतनवाढ एप्रिलमध्ये जाहीर केली जाईल.
अहवालात नमूद केलेल्या सूत्रांनुसार, कंपनीने पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना ‘अपेक्षा पूर्ण केल्या’, ‘प्रशंसनीय कामगिरी’ आणि ‘उत्कृष्ट कामगिरी’, अशा तीन कामगिरी श्रेणींमध्ये वर्गीकृत केले. अपेक्षा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना 5-7 % पगारवाढ मिळाली, तर प्रशंसनीय म्हणून रेट केलेल्या कर्मचाऱ्यांना 7-10 % पगारवाढ मिळाली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, 10% ते 20% पर्यंत पगारवाढ देण्यात आली. ‘सुधारणेची आवश्यकता आहे’, म्हणून रेट केलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पगारवाढ मिळाली नाही.
या पगार सुधारणा जॉब लेव्हल 5 (टीम लीडर्सपर्यंत) आणि जॉब लेव्हल 6 (उपाध्यक्षांपेक्षा कमी व्यवस्थापक) मधील कर्मचाऱ्यांना लागू झाल्या. जेएल 5 मधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ 1 जानेवारीपासून लागू होईल, तर जेएल 6 कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पगार 1 एप्रिलपासून लागू होतील. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या शेवटच्या वेतन सुधारणेच्या तुलनेत सर्व कामगिरी बँडमध्ये नवीनतम पगारवाढ 5-10% कमी असल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या कामगिरी बोनसमध्ये (व्हेरिएबल वेतन) देखील अशीच कपात दिसून आली आहे, जी सध्याच्या उद्योगातील मंदीचे प्रतिबिंब आहे.
इन्फोसिसमध्ये सुमारे 3.23 लाख कर्मचारी आहेत आणि नवीनतम पगारवाढ सप्टेंबर 2023 ऑक्टोबर 2024 या कालावधीतील मूल्यांकन कालावधीवर आधारित आहे. कर्मचाऱ्यांना डिसेंबरमध्ये त्यांचे कामगिरी रेटिंग मिळाले. एका कर्मचाऱ्याने ईटीला सांगितले की, कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ अपेक्षित होती. सध्याच्या या वाढीमुळे अनेक कर्मचारी नाराज आहेत. अर्थात, आम्हाला हे देखील माहित आहे की उद्योग एका आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. दरम्यान, 1 नोव्हेंबर 2023 नंतर इन्फोसिसने केलेली ही पहिली पगारवाढ आहे. कंपनीने यापूर्वी आर्थिक वर्ष 2022 मध्ये रोख रक्कम वाचवण्यासाठी पगारवाढ रोखली होती आणि ऑक्टोबर 2023 मध्ये वार्षिक मूल्यांकन चक्र पुन्हा सुरू केले. (हेही वाचा: Indian Tech Industry Jobs: आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय तंत्रज्ञान उद्योग 1.25 लाख नोकऱ्या निर्माण करेल- NASSCOM Report)
दुसरीकडे, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत, इन्फोसिसने निव्वळ नफ्यात 11.4% वाढ नोंदवली आहे, जो $800 दशलक्ष झाला आहे, तर महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.6 % वाढून $4.9 अब्ज झाला आहे. कंपनीने असेही जाहीर केले की, 2024-25 या आर्थिक वर्षात 15,000 फ्रेशर्सना नोकरीवर ठेवण्याची त्यांची योजना अजूनही मार्गावर आहे आणि पुढील आर्थिक वर्षात 20,000 फ्रेशर्सना नोकरीवर ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.