Infosys Hiring: आयटी कंपनीत (IT Company) नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्फोसिस (Infosys) ही आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी लवकरच 15 ते 20 हजार पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करणार आहे. ही भरती आर्थिक वर्ष 2025 साठी असेल आणि विशेष बाब म्हणजे या नोकऱ्या फ्रेशर्ससाठी आहेत. म्हणजे महाविद्यालयीन पदवीधर या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील.
इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका सांगतात की, ही भरती कंपनीच्या वाढीवर अवलंबून आहे, पण या वर्षी कंपनी 15 ते 20 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करेल असा अंदाज आहे. असे झाले तर आयटी कंपन्यांमधील मोठ्या नोकऱ्यांच्या दुष्काळातून तरुणांना दिलासा मिळू शकतो.
गेल्या वर्षीच्या तुलनेत इन्फोसिसने यंदा खूप कमी उमेदवारांना नोकऱ्या दिल्या होत्या. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीने केवळ 11,900 फ्रेशर्सना कामावर घेतले. तर 2023 मध्ये ही संख्या 50,000 होती. त्यानुसार यंदा फ्रेशर्सच्या भरतीत 76 टक्के घट झाली आहे. मात्र यासंदर्भात कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी सांगतात की, गेल्या अनेक तिमाहीत त्यांनी वेगाने भरती केली आहे. कंपनी कॅम्पसच्या आतून आणि बाहेरून फ्रेशर्सची नियुक्ती करते. त्यांनी असेही सांगितले की, या तिमाहीत लोकांची संख्या केवळ 2000 ने कमी झाली आहे, जी मागील वेळेच्या तुलनेत खूपच कमी आहे.
मात्र, कंपनीच्या वाढीचा विचार करून नवीन लोकांना कामावर घेण्याचा विचार केला जाईल. आगामी वर्षासाठी 15 ते 20 हजार उमेदवारांना नियुक्ती दिली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 2025 या आर्थिक वर्षात सुमारे 25,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. त्यापैकी पहिल्या तिमाहीत सुमारे 11 हजारांना कामावर घेण्यात आले आहे. तुलना केल्यास, इन्फोसिसने सलग सहाव्या तिमाहीत 1908 कर्मचारी कमी केले आहेत, तर टीसीएसने 5454 कर्मचारी वाढवले आहेत. (हेही वाचा: State Tourism Policy 2024: राज्याच्या पर्यटन क्षेत्रात निर्माण होणार 18 लाख रोजगार; सरकारकडून 1 लाख कोटींची गुंतवणूक)
दरम्यान, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी (18 जुलै) चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एप्रिल-जून 2024 तिमाहीचे हे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर (YoY) 7.1% ने वाढून 6,368 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत (Q1FY24) कंपनीचा निव्वळ नफा 5,945 कोटी रुपये होता.