Hiring In IT Sector: देशातील आयटी क्षेत्रावर मंदीचा मोठा परिणाम; 40 टक्के कमी होऊ शकतात नोकऱ्या
Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जगभरातील अनेक कंपन्या अजूनही आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. मंदीमुळे वाढ ठप्प झाल्याने नोकर भरतीचे प्रमाणही कमी झाले आहे. येत्या काही महिन्यांत आयटी क्षेत्रातील (IT Sector) नव्या भरतीवरही मंदीचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. देशात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देणारे आयटी क्षेत्र सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. गेल्या एक वर्षापासून आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी छाटणी आणि भरतीबाबत विविध धोरणे अवलंबली आहेत. त्याचा परिणाम भविष्यातही दिसून येण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांनी नोकरभरतीत लक्षणीय घट केली असून भविष्यातही असेच वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीतील कमाईने भारतातील आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत दिले आहेत. अहवालानुसार, देशातील आयटी उद्योगावरील संकट इतके वाढले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 40 टक्के कमी नोकऱ्या दिल्या जातील. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, बंगळुरूस्थित डेटा कंपनी Xpheno ने सांगितले की, कंपन्यांनी पहिल्या तिमाहीतच नोकरभरती कमी केली आहे.

Xpheno च्या मते, टॉप आयटी सेवा कंपन्या आर्थिक वर्ष 2024 मध्ये सरासरी 50,000 ते 100,000 कर्मचारी नियुक्त करतील अशी अपेक्षा आहे. आकडेवारीनुसार. मागील वर्षीच्या 250,000 च्या तुलनेत यंदाची ही मोठी घसरण आहे. पुढील वर्षी 2024 च्या पहिल्या तिमाहीत, भारतातील शीर्ष पाच आयटी कंपन्या TCS), Infosys, HCLTech, Wipro आणि Tech Mahindra मध्ये सरासरी 21,838 कर्मचारी कपात दिसून येईल.

तर देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ 500 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग असलेल्या Accenture, Capgemini आणि Cognizant सारख्या जागतिक आयटी कंपन्यांमध्येही अलीकडच्या तिमाहीत 5,000 पेक्षा जास्त कर्मचारी घटले आहेत. (हेही वाचा: Astra Layoffs: अमेरिकन स्पेस कंपनी एस्ट्रामध्ये कर्मचारी कपात; 25 टक्के कर्मचाऱ्यांना टाकले कामावरून काढून)

टीमलीज डिजिटलचे सीईओ सुनील सी यांच्या मते, चालू आर्थिक वर्षात सेक्टरमध्ये 40% कमी हायरिंग अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांचा कमीत कमी वापर करण्याचा कंपन्यांचा हेतू असून त्याऐवजी त्या तंत्रज्ञानावर अधिक भर देत आहेत. ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी पाहिली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपन्यांनी 50 टक्के कमी भरती केली आहे.