फेसबुक वापरताय? सावधान! विकले जात आहेत तुमचे 'प्रायव्हेट मेसेज'
फेसबुक (संग्रहित प्रतिमा)

युजर्सच्या डेटा सुरक्षेवरुन आगोदरच वादात सापडलेल्या फेसबुकसमोर आणखी एक नवीच समस्या उभी राहीली आहे. ज्याचा थेट परिणाम युजर्सच्या व्यक्तिगत जिवनाशी आहे. फेसबुकवरुन युजर्सचा चोरी केलेला डेटा गैरमार्गाने वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे ८१ हजार युजर्सची फेसबुक अकाऊंट्स हॅक करण्यात आली असून, त्यासोबत त्यांच्या मेसेज बॉक्समधील प्रायव्हेट मेसेजही विकले जात आहेत. या प्रकारमुळे फेसबुक युजर्समध्ये एकच खळबळ उडाली असून, यावर फेसबुक काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यमान वर्षातील सप्टेंबर महिन्यात FBSaler नावाच्या एका युजरने सुमारे १२० मिलियन (१२ कोटी) अकाऊंट्स विकल्याची माहिती 'इंटरनेट फोरम'ला दिली. त्यानंतर हा प्रकार पुढे आला. 'सायबर सिक्यॉरिटी फर्म डिजिटल शॅडोज'ने या प्रकरणाचाचा सखोल तपास केला. या तपासाअंती मोठी धक्कादायक माहिती पुढे आली. ती म्हणजे, तब्बल ८१ हजार अकाउंट्सची खासगी माहिती (प्रायव्हेट मेसेज) विकण्यात आली होती.

'बीबीसी रशिया'ने या प्रकाराची पडताळणी करुन दिलेल्या वृत्ता म्हटले आहे की, या प्रकाराच्या पुष्टीसाठी अशा पाच फेसबुक मेंबर्सना संपर्क करण्यात आला ज्यांचे प्रायव्हेट मेसेज विकण्यात आले होते. या फेसबुक मेंबर्सना मेसेज दाखवून विचारले असता त्यांनी हे मेसेज आपलेच असल्याचे सांगितले. धक्कादायक असे की, या मेसेजमध्ये केवळ टेक्स्ट मेसेजच नव्हे तर, चक्क काही फोटो आणि इमेजेसही होते. बीबीसीने आपल्या वृत्तात असेही म्हटले आहे की, हे खासगी मेसेज मेलवेअर वेबसाईट्स आणि ब्राऊजर एक्सटेंशनमधून घेण्यात आले असावे. ज्या युजर्सची अकाऊंट्स आणि मेसेज आदींची विक्री होते आहे ते प्रामुख्याने यूक्रेन, रशिया, यूके, अमेरिका आणि ब्राझील देशातील आहेत. पण, इतर देशांतूनही काही प्रमाणात असे प्रकार घडल्याचे पुढे येत आहे. (हेही वाचा, WhatsApp Update : आता व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये प्रायव्हेट रिप्लाय करण्याची सोय !)

प्रसारमाध्यमानी दिलेल्या वृत्तानुसार, हॅकर्स ही माहिती प्रति अकाऊंट १० सेंट म्हणजेच ६ रुपये ५० पैशांमध्ये विकत आहेत. तसेच, ज्या वेबसाईटवरुन हा डेटा विक्रिसाठी ठेवण्यात आला आहे ती, सेंट पीटर्सबर्ग येथील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सर्व युजर्सची अकाऊंट्स सुरक्षीत असून, अशा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही युजर्सचे अकाऊंट हॅक झाले नाही. तसेच, त्यांचे संदेशही लीक झाले नाहीत, असे स्पष्टीकरण देत फेसबुकने युजर्सना दिला आहे.