CEO of Google Sundar Pichai (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने उग्र रूप धरायला सुरुवात केल्यानंतर ताबडतोब, जगातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) म्हणजेच घरातून काम करण्याची मुभा दिली. यामध्ये गुगल (Google), ट्वीटर, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांनी सर्वात प्रथम हा निर्णय घेतला होता. आता कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गुगलने आपल्या कर्मचार्‍यांचा घरून काम करण्याचा अवधी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत वाढवला आहे. तंत्रज्ञान दिग्गज कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुगलचे कर्मचारी जुलै 2021 पर्यंत घरातून काम करू शकतात.

या संदर्भात गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक (Alphabet Inc.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कर्मचार्‍यांना ईमेल पाठविला आहे. या ई-मेलमध्ये ते लिहितात, 'कर्मचार्‍यांना पुढील नियोजन करण्यासाठी आम्ही घरातून काम करण्याचा पर्याय जुलै 2021 पर्यंत वाढवत आहोत. हे अशा कर्मचाऱ्यांसाठी असेल ज्यांना कार्यालयातून काम करण्याची आवश्यकता नाही.' अमेरिकन मीडियाच्या वृत्तानुसार सुंदर पिचाई यांनी काही महत्त्वाच्या गुगलच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर स्वत: हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Infosys ची आतापर्यंतची सर्वात मोठी डील; 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार अमेरिकन कंपनी Vanguard)

वॉल स्ट्रीट जर्नलने गूगलच्या घोषणेबद्दल प्रथम माहिती देताना सांगितले, याचा फायदा जगभरातील 2 लाखाहून अधिक कर्मचारी आणि गूगलच्या कंत्राटदारांना होणार आहे. याआधी गुगलने घरातूनच कामाचा पर्याय जानेवारीपर्यंतच ठेवला होता. गुगलच्या या निर्णयानंतर आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासह इतर मोठ्या कंपन्याही आपल्या कर्मचार्‍यांचा घरापासून काम करण्याचा कालावधी वाढवू शकतात, अशी अपेक्षा आहे. याआधी सोशल मीडिया कंपनी ट्विटरने जाहीर केले होते की, त्यांचे कर्मचारी अनिश्चित काळासाठी घरातून काम करू शकतात.