Bolo app launched by Google (Photo Credits: Twitter)

गुगलने (Google) नवे फ्री अॅप 'बोलो' (Bolo) लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे हिंदी आणि इंग्रजीचे धडे देण्यात येणार आहे. लहान मुलांना हिंदी, इंग्रजीत बोलण्याचे, वाचण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. भारतात प्रथमच हे अॅप लॉन्च करण्यात आले असून हे 'टेक्स्ट टू स्पीच' या तंत्रज्ञानावर काम करते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या अॅपमध्ये एक अॅनिमेटेड पात्र देण्यात आले असून ते मुलांना गोष्टी वाचण्यास प्रोत्साहीत करेल. शब्दांचे उच्चार करण्यास अडचण आल्यास त्यातही मुलांची मदत केली जाईल. त्यामुळे मुलांचे मनोबल वाढेल. गुगल इंडियाचे नितीन कश्यप यांनी सांगितले की, "या अॅपचे डिझाईन असे करण्यात आले आहे की, ज्यामुळे हे अॅप ऑफलाईन देखील काम करेल. यासाठी तुम्हाला फक्त 50 एमबीचे हे अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल करायचे आहे. यात हिंदी आणि इंग्रजीच्या तब्बल 100 कथा आहेत."

हे अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून अगदी फ्री आहे. हे अॅनरॉईड 4.4 किटकॅट आणि त्यानंतरच्या अपग्रेडट डिव्हाईसवर काम करेल. या अॅपचे सुमारे 200 गावात परिक्षण करण्यात आले आहे. अॅपला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याने अॅपचे लॉन्चिंग करण्यात आले, अशी माहिती कश्यप यांनी दिली. हे अॅप इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याचाही त्यांचा मानस आहे.