Flipkart Jobs: खुशखबर! फेस्टीव्ह सिझनच्या आधी फ्लिपकार्ट देणार 1 लाखांहून अधिक जणांना नोकऱ्या; जाणून घ्या सविस्तर
Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील आयटी, विमा, वाहन, आरोग्य सेवा आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) अशा विविध क्षेत्रात ऑगस्ट 2023 मध्ये कार्यालयीन भरती वार्षिक आधारावर सहा टक्क्यांनी घटली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये 2,666 नोकऱ्या होत्या, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही संख्या 2,828 होती. नोकरी जॉबस्पीक इंडेक्सनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये मासिक आधारावर नोकऱ्यांमध्ये चार टक्के वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात जुलै 2023 मध्ये 2,573 नोकऱ्या होत्या. अशा प्रकारे एकीकडे नोकऱ्या कमी होत असताना इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारीत आहे.

फ्लिपकार्टने सोमवारी सांगितले की, ते सणासुदीच्या अगोदर म्हणजेच यावर्षीच्या फेस्टीव्ह सिझनच्या आधी त्यांच्या पुरवठा साखळीत (Supply Chain) 1,00,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकर्‍या निर्माण करतील. यामध्ये पूर्ती केंद्रे, वर्गीकरण केंद्रे आणि वितरण केंद्रे यांचा समावेश आहे.

या हंगामी नोकऱ्या असतील व त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिकांचा समावेश असेल. हे रोजगार किराणा माल वितरण भागीदार, महिला, अपंग व्यक्ती (PWD) अशा लोकांसाठीही उपलब्ध असतील. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘द बिग बिलियन डेजमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. या वर्षी आम्ही आमच्या पुरवठा साखळीत देशभरात एक लाखाहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण करत आहोत. आम्ही आमच्या पाऊलखुणा मजबूत करण्यासाठी तसेच ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी कौशल्य उपक्रमांमध्येही गुंतवणूक करत आहोत.’ (हेही वाचा: OMG! व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केला स्मार्टफोन, बॉक्समध्ये आला बॉम्ब; जाणून घ्या काय घडले पुढे)

कंपनी त्यांच्या किराणा वितरण कार्यक्रमाद्वारे 40 टक्क्यांहून अधिक शिपमेंट वितरित करण्याची योजना आखत आहे. ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने सांगितले की, ते सप्लाय चेनमध्ये सामील होणा-या कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे खास क्युरेट केलेले कौशल्य उपक्रम हाती घेते, ज्यामुळे स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला लक्षणीयरीत्या चालना मिळते. या नव्याने भारती केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते भविष्यासाठी तयार होतात.