इंटरनेट खरोखरच बंद होणार? अफवा की सत्य? घ्या जाणून..
इंटरनेट वापरताना समस्या येऊ शकतात (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

जगभरातील युजर्सचे इंटरनेट सुमारे ४८ तासांसाठी बंद होणार, असे वृत्त आपण वाचले असेलच. Russia Todayच्या वृत्ताचा हवाला देऊन बहुतांश प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले. आम्हीही दिले. पण, प्रसारमाध्यमांनी या वृत्ताचा अधिक पाठपुरावा केल्यानंतर समोर आले की, हे जितके सांगितले गेले तितके गंभीर प्रकरण नाही.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (ICANN) इंटरनेट बंद असलेल्या काळात क्रिप्टोग्राफिक की (KEY)बदलून नेहमीच्या देखभालीचे काम करेन. ही KEY इंटरनेट अॅड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टमसाठी मदत करते. जगभरात वाढत असलेल्या सायबर हल्ल्याच्या घटनांमुळे ही देखभाल करणे महत्त्वाचे होते. (हेही वाचा, अनेकांचे दुकान बंद, काहींचे काम सुरु: तब्बल ४८ तासांसाठी संपूर्ण जगाचे Internet Shutdown होणार!)

ICANNने म्हटले आहे की, क्रिप्टोग्राफिक की बदलण्याचे काम एक दिवस आगोदरपासूनच सुरु आहे. पण, त्याचा इंटरनेटची सुविधा किंवा वापर यावर विशेष फरक पडला नाही. कम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी (CRA)नेही म्हटले आहे की, काही युजर्सवर या बदलाचा परिणाम होऊ शकतो. पण जर त्यांचा नेटवर्क ऑपरेटर (ISP)या बदलांसाठी तयार नसेल तरच. अन्यथा नाही. युजर्स सिस्टम सिक्योरिटी एक्सटेंशन कार्यन्वीत करुन या त्रासापासून सूटका मिळवू शकतात. काही प्रसारमाध्यमांनी इंटरनेट ४८ तास बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. हे वृत्त निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.