(संग्रहित, संपादित प्रतिमा)

रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोनसारख्या खासगी कंपन्यांनी टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धेत बाजी मारल्याने एकमेव असलेली सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल काहीशी मागे पडली होती. मात्र, या कंपन्यांना टक्कर देत बीएसएनएलनेही आता कंबर कसली असून, ग्राहकांवर अनेक ऑफर्सची बरसात करत एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान, बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नुकताच एक वार्षीक प्लॅन लॉन्च केला होता. त्यानंतर बीएसएनएल आता प्रीपेड ग्राहकांसाठीही एक हटके प्लॅन घेऊन आली आहे. बीएसएनएल १,६९९ रुपये आणि २,०९९ रुपये असे दोन प्लॅन एकाच वेळी लॉन्च करत आहे. ज्यात प्रीपेड ग्राहकांना डेटा, व्हॉइस कॉलिंग, एसएएमएस, आणि पर्सनलाईज्ड रिंगटोनसारखे फायदे मिळणार आहेत.

पूर्ण वर्षभरासाठी प्लॅन

दरम्यान,बीएसएनएल १,६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला प्रति दिन २ जीबी डेटा तर, मिळणारच आहे. पण, त्याच्यासोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलींगची सेवाही मिळणार आहे. शिवाय, १०० एसएमएस आणि पर्सनलाइज्ड रिंगटोन निवडण्याची सेवाही मिळणार आहे. या प्लॅनची वैधता पूर्ण एक वर्षासाठी असणार आहे. अभ्यासकांच्या मते बीएसएनएलचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या १,६९९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देईल.

त्याच किमतीत अधिक डेटा

दरम्यान, रिलायन्स जिओने लॉन्च केलेला १,६९९ वाला प्लॅन दिवाळी ऑफर म्हणून लॉन्च केला होता. या प्लॅनमध्ये प्रतिदिन १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस ग्राहकाला मिळणार आहेत. विशेष असे की, १६९९ रुपयांच्या ज्या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ ५४७ जीबी डेटा देत आहे. त्याच किमतीच्या प्लॅनमध्ये बीएसएनएल आपल्या ग्राहकाला ७३० जीबी डेटा देत आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की बीएसएनएल रिलायन्स जिओपेक्षा अधिक डेटा त्याच किमतीत देत आहे. (हेही वाचा, व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे ही नवीन फीचर्स; आता बदलून जाईल चॅट करण्याची पद्धत)

ग्राहकांसाठी २९ ऑक्टोंबरपासून प्लॅन खुला

दरम्यान, २,०९९रुपयांच्या बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये प्रीपेड ग्राहकाला प्रतिदिन ४ जीबी डेटा मिळणार आहे. जर युजर्सने दिलेल्या कालावधीपेक्षा कमी काळात आपला डेटा संपवला तर, इंटरनेटचे स्पीड कमी होऊन ते ८० केबीपीएसवर येईल. गलेलठ्ठ डेटासोबत या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन १०० एसएमएस आणि पर्सनलाइज्ड रिंगटोनचीही सुविधा ग्राहकाला मिळणार आहे. बीएसएनएलचे हे दोन्ही प्लॅन २९ ऑक्टोंबरपासून ग्राहकांसाठी खुले होणार आहेत.