Call Recording Apps: अँड्रॉईड युजर्ससाठी मोठी बातमी; आता कॉल रेकॉर्ड करण्यासाठी वापरू शकणार नाही थर्ड-पार्टी अॅप्स
Representational Image (Photo Credit: PTI)

कॉल रेकॉर्ड (Call Recording) करण्यासाठी जर का तुम्ही थर्ड-पार्टी अॅपची (Third Party Apps) मदत घेत असाल, तर काही दिवसांनी तुम्ही तसे करू शकणार नाही. कारण गुगल (Google) चे नवीन धोरण अँड्रॉईड (Android) स्मार्टफोन्सवरील थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप्सवर कडक कारवाई करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 11 मे पासून अॅप डेव्हलपर थर्ड पार्टी अॅप्सद्वारे कॉल रेकॉर्डिंग फीचर प्रदान करू शकणार नाहीत. कंपनीने अलीकडेच आपल्या प्ले स्टोअर (Play Store) धोरणात काही बदल केले आहेत आणि त्यापैकी एक अँड्रॉईडवर कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद करणे हा आहे.

नवीन धोरणानुसार, अॅप्सना यापुढे प्ले स्टोअरवर कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी नाही. गेल्या काही महिन्यांपासून गुगलने कॉल रेकॉर्डिंग सुरू होताच यूजर्सना अलर्ट द्यायला सुरुवात केली होती आणि आता बातमी अशी आहे की कंपनी ते पूर्णपणे बंद करणार आहे. Reddit वापरकर्त्याच्या दाव्यानुसार, गुगल लवकरच एक अपडेट जारी करेल, ज्यानंतर अँड्रॉईड फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग बंद केले जाईल. कॉल रेकॉर्डिंग फिचर आयफोनमध्ये नाही. (हेही वाचा:  तुमच्या स्मार्टफोनमधून ताबडतोब डिलीट करा 'हे' 10 धोकादायक अॅप्स; नाहीतर होईल मोठे नुकसान)

गुगलने कॉल रेकॉर्डिंग बंद करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी Android 10 सह, Google ने त्यांच्या फोनमधून कॉल रेकॉर्डिंग फिचर काढून टाकले होते. गुगलचे म्हणणे आहे की, यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग असणे योग्य नाही. आता Android स्मार्टफोन वापरकर्ते इन बिल्ट कॉल रेकॉर्डरशिवाय स्मार्टफोन वापरत आहेत ते 11 मे नंतर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. माहितीसाठी, Samsung, OnePlus, Xiaomi अशा सर्व कंपन्यांच्या फोनमध्ये इन-बिल्ट कॉलिंग रेकॉर्डिंग सुविधा उपलब्ध आहे.