BYJU Layoff: बायजूमध्ये 400 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, परफॉर्मंस रिव्ह्यूचे दिले कारण
Byju

बायजूमधील नोकर कपात ही अद्याप ही सुरुच आहे. एज्यूकेशन स्टार्टअप असलेल्या या कंपनीत पुन्हा एकदा 400 कर्मचारी कपात केली आहे. या कर्मचाऱ्यांचे कामगिरी मूल्यांकना(performance review)च्या आधारे ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे. दुसरीकडे अंतिम तोडगा काढण्यासाठी कंपनीने या कर्मचाऱ्यांना केवळ  2 महिन्यांचा पगार देऊ केला आहे. बायजूमध्ये ही नोकर कपात मेंटरिंग (teaching staff) आणि उत्पादन तज्ज्ञ विभागात झाली आहे. कंपनीने जुलैमध्ये या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. यानंतर 17 ऑगस्ट रोजी कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना राजीनामे सादर करण्यास सांगितले आहे.

या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन अंतर्गत ठेवण्यात आले होते, परंतु त्या सगळ्यांनी कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे काम केले नाही. त्यामुळे योग्य ती प्रक्रिया अवलंबली जात आहे. ही नोकर कपात पूर्णपणे कामगिरीवर आधारित असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. अंतिम तोडगा म्हणून त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पगार देऊ करण्यात आला आहे. राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीच्या एचआर विभागाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये अंतिम सेटलमेंट रक्कम निकाली काढण्याचे म्हटले आहे. Byjus ने 2022-2023 मध्ये आतापर्यंत एकूण 5000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.