
Telecom News: सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीत ₹280 कोटींचा निव्वळ नफा (BSNL Profit) नोंदवला आहे. गेल्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर 2024 मध्ये ₹262 कोटींचा नफा (BSNL Revenue) झाल्यानंतर ही सलग दुसरी नफा ( BSNL Asset Monetisation) नोंदवलेली तिमाही ठरली आहे.
BSNL च्या बोर्डाने मान्य केलेले वार्षिक लेखा निकाल जाहीर
BSNL ने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचे लेखापरिक्षित निकाल आज (27 मे) जाहीर केले. हे निकाल कंपनीच्या 243 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा 58% नी कमी
2024 च्या याच तिमाहीत BSNL ला ₹849 कोटींचा तोटा झाला होता. मात्र संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा तोटा केवळ ₹2,247 कोटींवर आला असून 2023-24 मधील ₹5,370 कोटींच्या तुलनेत 58% नी घसरण झाली आहे.
ऑपरेशनल कामगिरीत लक्षणीय सुधारणा
BSNL ने ऑपरेशनल स्तरावरही चांगली कामगिरी बजावली आहे. 2024-25 मध्ये कंपनीच्या 27 टेलिकॉम सर्कल्सना EBITDA-हिशोबात नफा झाला, जे 2023-24 मध्ये केवळ 17 होते. तसेच, यंदा 10 सर्कल्सना निव्वळ नफा (Profit After Tax) झाला, जे गेल्या वर्षी फक्त 3 होते.
महसूलात 7.8% वाढ
BSNL चा एकूण ऑपरेशनल महसूल 2024-25 मध्ये ₹20,841 कोटी इतका झाला आहे, जो की 2023-24 मध्ये ₹19,330 कोटी होता. मोबिलिटी सेवा, फायबर टू द होम (FTTH), लीज्ड लाईन्स, एंटरप्राइज सेवा आणि मालमत्ता विक्री या सर्व क्षेत्रांतून कमाईत वाढ झाली आहे.
आगामी काळातही सकारात्मक अंदाज
कंपनीने यावर्षीच्या आकड्यांवरून पुढील काळात महसूलात सातत्याने वाढ आणि खर्चात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, अलिकडच्या काळात केलेली स्पेक्ट्रम खरेदी आणि भरीव भांडवली खर्च यामुळे तिमाही निकालांवर नजीकच्या काळात काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
बीएसएनएल नफ्यात का?
"मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी BSNL चा नफा वाढीचा प्रवास भक्कम आहे," असे दूरसंचार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण देशभरात 4G/5G नेटवर्कचा विस्तार, स्वदेशी (आत्मनिर्भर) उपकरणांचा वापर, '5G नेटवर्क-एज-ए-सर्व्हिस' उपक्रम, मुख्य नेटवर्कमध्ये गुंतवणूक, आणि जुन्या फायबर बॅकहॉलचे आधुनिकीकरण यामुळे नजीकच्या काही वर्षांत तेजीने वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मालमत्ता विक्रीत दुप्पट वाढ, नव्या गुंतवणुकीस चालना
BSNL ने गेल्या आर्थिक वर्षात आपली मालमत्ता विक्री जवळपास दुप्पट केली आहे. या विक्रीतून मिळणारा निधी पुन्हा कंपनीच्या भांडवली योजनांमध्ये गुंतवला जाणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
‘BSNL ची नवी भरारी’ – CMD
BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांनी सांगितले की, 'ही झपाट्याने झालीलेली उलथापालथ ही व्यावसायिक व्यवस्थापन, सरकारी पाठबळ आणि नफ्याच्या आणि महसूलाच्या दोन्ही बाजूंवर लक्ष केंद्रित करण्याचे फलित आहे. BSNL केवळ पुनरुज्जीवित होत नाही, तर नव्याने परिभाषित होत आहे.'
‘नफा हे अंतिम उद्दिष्ट नाही, उत्कृष्ट सेवा हे आमचे ध्येय’ – BSNL
'खर्चावर नियंत्रण आणि 4G/5G प्रक्षेपणाचा वेग वाढवत आम्ही हा वाढीचा ट्रॅक कायम ठेवू. नफा आमचा अंतिम हेतू नाही. संपूर्ण भारताला परवडणारी आणि दर्जेदार सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. जेव्हा आपण योग्य गोष्टी सतत करतो - म्हणजेच उत्कृष्ट सेवा देतो, वंचितांपर्यंत पोहोचतो आणि सर्वसमावेशकतेसाठी नवकल्पना करतो - तेव्हा नफा नैसर्गिकपणे येतो,' असे रवी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.
दरम्यान, BSNL च्या या बदलामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात पुन्हा एकदा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला नवे बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.