Amazon Virtual Try-On Shoes: आता ऑनलाईन शॉपिंग करताना व्हर्च्युअल ट्राय करू शकता शूज; अॅमेझॉन घेऊन येत आहे नवे फिचर
Amazon Virtual Try-On Shoes (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपण अनेकजण अॅमेझॉन (Amazon) सारख्या ऑनलाईन साईट्सवरून शूज विकत घेतो. मात्र अनेकदा शूजची डिलिव्हरी झाल्यानंतर हे शूज पायात व्यवस्थित बसत नसल्याचे किंवा आपल्या पायात चांगले दिसत नसल्याचे दिसून येते. अशावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता लवकरच हा त्रास संपणार आहे. अॅमेझॉनवर व्हर्च्युअल ट्राय ऑनचे फीचर्स (Virtual Try-On) येऊ घातले आहे. या फीचर्सच्या मदतीने साईटवरील शूज आपल्या पायात कसे बसतील कसे दिसतील हे यूजर्स पाहू शकतील. हे फीचर्स युजर्ससाठी खूपच उपयुक्त ठरू शकेल.

याआधी लेन्सकार्ट (Lenskart) ने असा आभासी चष्मा ट्राय करण्याचा पर्याय दिला आहे. अॅमेझॉनचे हे फिचर सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून ते प्रथम आयओएस (iOS) साठी रिलीज केले जाईल. सर्वात आधी हे फिचर अमेरिका आणि कॅनडामधील युजर्स वापरू शकतील. इतर देशांमध्ये ते कधी सादर केले जाईल याची माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाही.

उत्पादनाच्या खाली हे व्हर्च्युअल ट्राय ऑनचे फिचर मिळेल. या पर्यायाच्या मदतीने ते शूज पायात घातलेले तुम्हाला दिसतील. आपण प्रत्येक कोनातून ते शूज पाहू शकाल. यावरून ते शूज आपल्या पायावर नक्की कसे दिसतात हे सुद्धा युजर्सना समजेल. हे व्हर्च्युअल डिस्प्लेवर दिसणारे फोटो इंटरनेटवर शेअर केले जाऊ शकतात. तसेच, फीडबॅक मिळवण्यासाठी तुम्ही मित्र किंवा इतर कोणाशीही ते शेअर करू शकता. तुम्ही या शूजचा रंगही बदलू शकता. हे फिचर सर्वांपर्यंत पोहोचवण्यात अॅमेझॉनला यश आले, तर अनेक समस्या दूर होतील. (हेही वाचा: जाणून घ्या काय आहे डिजिटल ड्रग्ज; दारू, कोकेन, चरस, गांजानंतर नशेसाठी होत आहे खास प्रकारच्या संगीताचा वापर)

दरम्यान, अॅमेझॉन फॅशनचे अध्यक्ष मुगे एरड्रिक डोगन म्हणाले की, ‘अॅमेझॉन फॅशनचे उद्दिष्ट त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम अनुभव निर्माण करणे हा आहे. जेणेकरून फॅशनसाठी ऑनलाइन खरेदी करणे ग्राहकांसाठी सोपे आणि अधिक आनंददायक अनुभव देणारे ठरेल.’