कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी गेल्या 11 दिवसांपासून भारतात संपूर्ण लॉक डाऊन (Lockdown) सुरु आहे. याकाळात उपयुक्त सेवा-सुविधा सोडून इतर सर्व गोष्टी बंद आहेत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना स्मार्टफोन रिचार्ज करण्यात अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता भारतीय दूरसंचार नियामकाने सर्व दूरसंचार कंपन्यांना 21 दिवसांच्या लॉक डाऊन दरम्यान, इनकमिंग कॉल्स बंद न करण्याचे निर्देश दिले होते. याच्या एक पाऊल पुढे जाऊन रिलायन्स जिओने या आठवड्याच्या सुरूवातीला, आपल्या ग्राहकांसाठी एटीएम रिचार्ज (ATM Recharge) सुविधा सुरू केली आहे. आता एअरटेलनेही (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी यात थोडे बदल करत ही सुविधा सुरु केली आहे. म्हणजेच आता एअरटेल ग्राहक किराणा दुकान आणि औषधांच्या दुकानातही रिचार्ज करू शकणार आहेत.
दूरसंचार नियामकाच्या निर्देशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या वापरकर्त्यांसाठी इनकमिंग कॉल्स बंद न करण्याचा आणि 10 रुपये प्रीपेड बॅलन्स देण्याची घोषणा केली होती. आता जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांनी एटीएम, फार्मसी आणि ग्रोसरी शॉप्समध्ये रिचार्जची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांच्या एटीएममध्ये रिचार्ज सुविधा सुरु करण्यासाठी, एअरटेलने या दोन्ही बँकांशी भागीदारी केली आहे. तसेच रिचार्ज सुविधेसाठी कंपनीने बिग बाजार आणि अपोलो फार्मेसीसोबतही भागीदारी केली आहे. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक ग्राहक संबंधित एटीएममधून त्यांचे एअरटेल प्रीपेड नंबर रिचार्ज करू शकतील. (हेही वाचा: Work From Home करणाऱ्यांना BSNL देणार एक महिन्यासाठी मोफत इंटरनेट सेवा)
ही प्रक्रिया नक्क्की कशी पार पडेल याबद्दल एअरटेलने तपशीलवार माहिती दिलेली नसली, तरी बहुधा ती जिओसारखीच असेल असा अंदाज लावला जात आहे. जिथे ग्राहक एटीएममध्ये रिचार्ज पर्याय निवडून, त्यांचा मोबाइल नंबर प्रविष्ट करू शकतात. रिचार्जची रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वजा केली जाईल.