ट्विटरचे (Twitter) अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत. नुकतीच त्यांनी ब्लू टिकसाठी 8 डॉलर शुल्क आकारले जाणार असल्याची घोषणा केली. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की, फक्त ब्लू टिकसाठीच पैसे आकारले जातील, तर तसे नाही. नव्या अहवालानुसार ट्विटर वापरण्यासाठी देखील युजर्सकडून पैसे आकारण्यात येण्याची शक्यता आहे. यावरून दिसून येत आहे की, एलॉन मस्क यांचे नियोजन खूप मोठे आहे.
एका अहवालात म्हटले आहे की, मस्क सोशल मीडिया साइट ट्विटर वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. तुमच्या खात्यावर निळ्या रंगाची टिक आहे की नाही याने फरक पडत नाही, तुमचे जर ट्विटर खाते असेल, तर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतील.
अहवालात पुढे म्हटले आहे की एलॉन मस्क ट्विटर वापरकर्त्यांसाठी सदस्यता योजना घेऊन येऊ शकतात. म्हणजेच, ट्विटरवर प्रवेश करण्यासाठी आणि मायक्रो ब्लॉगिंग साइट वापरण्यासाठी, वापरकर्त्याला काही सबस्क्रिप्शन शुल्क द्यावे लागेल. यावरून मस्क ट्विटरद्वारे मोठी कमाई करू शकतील. एलॉन मस्कचे प्लॅनिंग प्रत्यक्षात आल्यास, मस्कची ट्विटरवरून दुहेरी कमाई होऊ शकेल.
एकीकडे मस्कना ब्लू टिकसाठी दरमहा 8 डॉलर्स घ्यायचे आहेत, जे भारतीय चलनात सुमारे 660 रुपये असेल. दुसरीकडे, नवीन योजना ट्विटर वापरकर्त्यांसाठी सदस्यता शुल्क आकारण्याची आहे. अहवालात असे म्हटले आहे की मस्क यांनी त्यांच्या टीमसोबत झालेल्या बैठकीत या कल्पनेचा विचार केला आहे. मस्क विचार करत आहे की, प्रत्येक महिन्याला एका विशिष्ट कालावधीसाठी यूजरला ट्विटरवर मोफत प्रवेश मिळेल, त्यानंतर यूजरला सबस्क्रिप्शन फी भरावी लागेल. (हेही वाचा: Twitter Lays Off: ट्विटरने भारतातील 90% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले- Reports)
विनामूल्य ऑफर संपल्यानंतर, वापरकर्ता ट्विटर साइट उघडू शकणार नाही आणि सदस्यता शुल्क भरल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळेल. सध्या याचे नियोजन सुरू असून त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. सध्या एलॉन मस्क सध्या ट्विटरच्या ब्लू टिक प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. हे फीचर एका महिन्यात भारतात लॉन्च केले जाऊ शकते. हा नियम लागू झाल्यानंतर मस्क इतर युजर्ससाठी सदस्यता शुल्क लागू करू शकतात.