एका खराब फोनच्या रिफंड ऐवजी गुगल ने पाठवले चक्क 7 लाखाचे 10 फोन
Google Pixel 3 | (Photo Credits: IANS)

एखादा नवीन फोन विकत घेतल्यास कंपनीकडून वॉरंटी नक्कीच दिली जाते. त्यानंतर फोन खराब झाल्यास कंपनी फोनच्या बदल्यात पैसेदेखील परत देते. मात्र या पैशांच्या ऐवजी कंपनीने तुम्हाला अजून 10 फोन दिले तर? असे घडू शकेल यावर विश्वास बसत नाही ना? पण असे घडले आहे, आणि तेही गुगल (Google) कंपनीकडून. अमेरिकेमध्ये एका ग्राहकाला पिक्सल 3 (Pixel 3) या फोनच्या बदल्यात रिफंड ऐवजी कंपनीने चक्क अजून 10 फोन दिले आहेत.

तर या ग्राहकाने पिक्सल 3 फोन विकत घेतला, मात्र त्यात काही अडचण आल्याने या ग्राहकाला हा फोन परत द्यायचा होता, त्याबदल्यात त्याला आपले पैसे परत हवे होते. याबाबत त्याने कस्टमर केअरशी संपर्क साधला, गुगलने त्याला 900 डॉलरच्या फोनच्या ऐवजी चक्क 10,000 हजार डॉलर किमतीचे 10 फोन पाठवले. मात्र आपला मूळ रिफंड न मिळाल्याने या व्यक्तीने त्याची तक्रार सोशल मिडियावर नोंदवली. (हेही वाचा: गुगल कंपनी Google Play Artist Hub ही सेवा येत्या 30 एप्रिल पासून बंद करणार)

या तक्रारीला गुगलने काही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे इतर काही टेक साईट्स आणि अँड्रॉइड पोलीस यांनी गुगलला या तक्रारीची दाखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर गुगलने या व्यक्तीशी संपर्क साधून त्याच्या एका फोनचे पैसे परत केले. या व्यक्तीने परत सोशल मिडियावर पोस्ट करून याबाबत गुगलचे आभार मानले आहेत.