
मागच्या वर्षी अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार व्हावे लागले होते. कार्यकाल संपण्याआधीच कुंबळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे फार मोठा गदारोळ माजला होता. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सोबत उडत असलेल्या खटक्यांनंतर कुंबळेनी राजीनाम दिला होता. आता इतके महिने शांत असलेला हा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शासक समितीच्या (CoA) सदस्या डायना एडुल्जी (Diana Edulji) यांनी या विषयाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कुंबळे यांना त्यांच्या पदावरून पायउतार होण्यासाठी विराट कोहलीच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नियुक्तीदरम्यान बीबीसीआय (BCCI) ने अनेक नियमांचे उल्लंघन केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक पदावरून हटवा, अशी मागणी करणारे तब्बल सात ई-मेल बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना पाठवले होते. कुंबळे यांच्या समाधानकारक कामगिरीमुळे प्रशासकीय समितीचा या मागणीला नकार होता. मात्र बीसीसीआयने विराट कोहलीची मागणी मान्य केली. कुंबळे यांना हटवून त्यांची जागा रवी शास्त्री यांना देण्यात आली. जून 2017 मध्ये कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी विराट कोहलीला आपल्या प्रशिक्षणाची पद्धत पसंत नाही म्हणून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता एडुल्जीमार्फत यामागील खरे सत्य बाहेर आले आहे. (हेही वाचा : मिताली राजचा प्रशिक्षकांवर गंभीर आरोप; नजरकैदेत ठेवल्याचा गौप्यस्फोट)
भारतीय महिला क्रिकेट संघात मिताली आणि रमेश पोवार यांच्यात चाललेल्या वादामुळे हा कोहली-कुंबळे मुद्दा उपस्थित झाला आहे. ‘जर कोहलीच्या मागणीनुसार शास्त्री यांना भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात येत असेल, तर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या पाठिंब्यानंतर रमेश पोवारला महिला संघाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवणे यात गैर ते काय आहे?’ असा प्रश्न डायना एडुल्जी यांनी उपस्थित केला आहे. महिला क्रिकेट टीमसाठी बीबीसीआयने नव्याने निविदा मागवल्या आहेत. प्रशिक्षक होण्यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज केले आहेत. या इच्छुकांची मुलाखत कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांची समिती 20 डिसेंबरला मुंबईमध्ये घेणार आहे. अर्जदारांमध्ये मनोज प्रभाकर, दिमित्री मास्करेनहास यांचा समावेश आहे. याचबरोबर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा भारतीय महिला टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.