महिलांच्या टी 20 विश्वचषकात मिताली राज (Mithali Raj) ला उपांत्यफेरीच्या सामन्यात न खेळवण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला वादाला आता एक वेगळेच वळण लागले आहे. मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार (Ramesh Powar) यांनी भेदभाव केला, आपणाला अपमानित केले असे आरोप केले आहेत. या संदर्भात तिने ‘बीसीसीआय’चे सीईओ राहुल जोहरी आणि सबा करीम यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात मिताली राज हिने संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांच्यावर आरोप केले आहेत. ‘काही लोक मला संपवायला बसले आहेत’, असे मितालीचे म्हणणे आहे.
भारतीय संघ महिला टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर झाला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा इंग्लंडने पराभव केला. या सामन्यात अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले होते. भारताने 4 पैकी 4 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण चौथ्या सामन्यात आणि उपांत्य फेरीत भारताची सर्वाधिक अनुभवी खेळाडू मिताली राज हिला संघातून वगळण्यात आले होते. याचबाबतीत मितालीने भेदभावाचा आरोप केला आहे; तसेच शासकीय समितीच्या सदस्य एडुलजी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला, हरमनप्रीतशी माझे काहीही भांडण नाही, पण तिने मला वगळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे मला खटकले, असे मितालीने म्हटले आहे.
याचसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्व खेळवण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मला प्रशिक्षक रमेश यांनी नजरकैदेत ठेवले होते, असा आरोपही तिने केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रसारमाध्यमांशी मी चर्चा करू नये आणि ड्रेसिंग रूममधून बाहेर पडू नये म्हणून मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असे तिने पत्रात लिहिले आहे.