US Open 2020: यूएस ओपन पुरुष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात, सुमित नागलचा पराभव करत डोमिनिक थीमने साजरा केला वाढदिवस
सुमित नागल (Photo Credit: Twitter/@airnewsalerts)

कोरोना काळात सध्या न्यूयॉर्क येथे सुरु असलेल्या यूएस ओपन (US Open) टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताचा सुमित नागल (Sumit Nagal) पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतून पराभवानंतर बाहेर पडला. नागलला ऑस्ट्रियाच्या (Austria) डोमिनिक थीमविरुद्ध (Dominic Thiem) सलग तीन सेटमध्ये 6-3, 6-3, 6-2 असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे काल, 3 सप्टेंबर रोजी थीमचा वाढदिवस (Theim 27th Birthday) होता आणि दुसरा मानांकित थीमने दुसऱ्या फेरीत नागलविरुद्ध विजयासह 27 वा वाढदिवस साजरा केला. यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळवून भारतीय टेनिस स्टार सुमितने इतिहास रचला होता. त्याने पहिल्या फेरीत ब्रॅडली क्लानला 6-1, 6-3, 3-6,6-1 अशा फरकाने पराभूत केले आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. 2013 नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरी गटातील दुसऱ्या फेरीत पोहचणारा पहिला भारतीय टेनिसपटू ठरला आहे. त्याच्याआधी सोमदेव देववर्मन ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पोहचला होता. (US Open 2020: भारत-सर्बियन दुहेरी जोडी दिविज शरण-निकोला कॅसिक क्रॅस पहिल्या फेरीत पराभवासह ग्रँड स्लॅम स्पर्धेतून आऊट)

गुरुवारी उशिरा झालेल्या सामन्यात थीमने सुमितचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला. या विजयासह थीमने तिसर्‍या फेरीत स्थान मिळविले. पहिल्या सेटमध्ये सुमितने थीमला काहीसे आव्हान दिले होते, परंतु थीमच्या अनुभवापुढे नागल पराभूत झाला. नागल सध्या जागतिक क्रमवारी 124 व्या स्थानावर आहे. सामना जिंकल्यानंतर थीमने म्हणाला की वाढदिवशी सामना जिंकण्यापेक्षा माझ्यासाठी काहीही चांगले नाही. दरम्यान तिसऱ्या फेरीत थीमचा सामना आता क्रोएशियाच्या मारिन सिलिच याच्याशी शनिवारी होईल. थीमचा पहिल्या फेरीतील सामना जौम म्यूनरविरुद्ध झाला होता. पण म्यूनरने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडल्याने थीमने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

जर्मनीमध्ये पीएसडी बँक नॉर्ड ओपन जिंकून कोविड-19 महामारीमुळे मिळालेल्या ब्रेकनंतर नागलने पुन्हा आपला टेनिस प्रवास सुरु केला. 23 वर्षीय नागल नेन्सेल टेनिस अकादमी येथे सराव करतो आणि कोरोना व्हायरस व आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे त्याने जर्मनीत राहण्याचा निर्णय घेतला.