पैलवान बजरंग पुनिया (Photo Credit: Instagram)

Tokyo Olympics 2020: तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) याला 65 किलो वजनी गटामध्ये ऑलिम्पिक सेमीफायनल सामन्यात अझरबैजानच्या हाजी अलीयेवने (Haji Aliyev) 12-5 असे पराभूत करून भारताच्या कुश्ती खेळात पहिले सुवर्ण पदक जिंकल्याच्या स्वप्नावर पाणी फेरले. दरम्यान, बजरंग उपांत्य फेरीत अपयशी ठरला असला तरी यंदाच्या ऑलिम्पिक (Olympis) खेळात एक पटकावण्याच्या त्याच्या आशा अद्यापही कायम आहेत. पुनिया आता कांस्य पदक सामन्यासाठी सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरेल. पुनियाकडे यंदाच्या ऑलिम्पिक कुश्ती खेळात दुसरे पदक पटकावण्याची संधी आहे.  पुनियाने उपांत्यपूर्व फेरीत आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेता इराणच्या मोर्तझा चेका घियासीचा पराभव केला होता. दोघांमध्ये सामन्यात कडवी झुंज बघायला मिळाली होती. (Tokyo Olympics 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना महिला हॉकी टीम अश्रू अनावर Watch Video)

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत कुस्तीमध्ये एक पदक जिंकले आहे. कुस्तीपटू रवी दहिया (Ravi Dahiya) अंतिम फेरीत रशियन पेहलवानकडून हरला पण तरीही त्याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. दुसरीकडे, भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया गुरुवारी येथे ऑलिम्पिक पदार्पणात कांस्य पदक जिंकण्याच्या अगदी जवळ आला, परंतु सॅन मारिनोच्या माइल्स नजम अमीनकडून शेवटच्या 10 सेकंदात 86 किलोच्या प्ले-ऑफमध्ये पराभूत झाला. अशास्थितीत आता पुनियाला ऑलिम्पिक पदक पटकावण्याची आणखी एक संधी मिळाली असून सामन्यात त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

2016 रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला आहे. 2018 आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. बजरंग हा जागितक कुस्ती स्पर्धेत तीन पदके पटकावणारा तो भारताचा एकमेव पैलवान आहे.