Tokyo Olympics 2020: महिला हॉकी सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाकडून भारतीय टीमचा 2-1 ने पराभव, हॉकी गोल्ड मेडलचं स्वप्न पुन्हा भंगलं
भारत महिला हॉकी टीम (Photo Credit: Twitter)

Women's Hockey Tokyo 2020: टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळातील महिला हॉकी सेमीफायनल सामन्यात भारत (India) आणि अर्जेन्टिना  (Argentina) यांच्यातील मॅच खूपच अटीतटीची झाली. भारतीय हॉकी टीमला अर्जेन्टिनाने 2-1 ने पराभूत केलं आहे. यासह पुरुष संघानंतर महिला हॉकी (Men's Hockey Team) गोल्ड मेडलचे स्वप्न देखील भंग झाले आहे. भारताकडून गुरजीत कौरने एकमेव गोल केला. दरम्यान, टीम इंडिया  (Team India) आता कांस्य पदकासाठी ग्रेट ब्रिटन (Great Britain) संघाविरुद्ध मैदानात उतरेल. ब्रिटिश महिला हॉकी संघाला पहिल्या सेमीफायनल सामन्यात नेदरलँडने 5-1 ने पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला होता. (IND vs BEL Tokyo 2020 Hockey: सुवर्ण स्वप्न भंगले! बेल्जियमविरुद्ध भारत पुरुष हॉकी टीम सेमीफायनलमध्ये 5-2 ने पराभूत)

भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठत टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता. राणी रामपालच्या 18 सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अर्जेन्टिनाविरुद्ध भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. अर्जेटिनाच्या चुकीमुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचा फायदा करून घेत ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत गोल केला. पहिल्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण सुशीला चानूने बचाव करत अर्जेंटिनाला बरोबरी करू दिली नाही. अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमणाला सुरुवात केली 37 वर्षीय कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत भारताशी बरोबरी साधली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाटची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, या पराभवासह आता महिला संघ देखील पुरुष संघाप्रमाणे कांस्य पदकासाठी मुकाबला करतील. टीम इंडियापुढे पदकाच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनचे आव्हान असणार आहे. मॉस्को येथे 1980 ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकी संघांने सहापैकी चौथे स्थान प्राप्त केले होते. 1980 नंतरची ही भारतीय महिला संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, यंदा भारतीय महिलांनी एक पाऊल पुढे टाकले आणि इतिहास घडवला.