भारताचा उदयोन्मुख स्टार टेनिसपटू सुमित नागल (Sumit Nagal) याने अर्जेटिनामध्ये खेळल्या गेलेल्या ब्युनोस आयर्स एटीपी चॅलेंजर्स (Buenos Airs Challenger) टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. 22 वर्षीय सुमितच्या कारकीर्दीत घराबाहेर जिंकलेले हे पहिले विजेतेपद आहे. रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित सुमितने अर्जेंटिनाचा खेळाडू फकुंडो बागानिस याचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-2 असा पराभव केला. सुमितने 37 मिनिटात मॅच जिंकली आणि इतिहास रचला. सुमितला नुकत्याच बंजा लुका चॅलेंजर्सच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, परंतु यावेळी त्याने कोणतीही चूक केली नाही आणि ब्युनोस आयर्स एटीपी चॅलेंजर्स जेतेपदासाठी दमदार खेळ केला. सुमितने 2017 मध्ये बेंगळुरूमध्ये पहिले जेतेपद जिंकले होते.
दरम्यान, या विजयानंतर सुमित, एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत 159 क्रमांकावरून 135 व्या क्रमांकावर पोहचला आहे. नागलने या स्पर्धेत 161 मानांकित म्हणून सहभाग घेतला होता. याआधी सेमीफायनलमध्ये त्याने जागतिक क्रमांकावारीत 108, थियागो मोंटेयरो चा 6-0, 6-1 असा पराभव केला होता.
दुसरीकडे, दक्षिण अमेरिकेच्या मातीवर विजेतेपद जिंकणारा सुमित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सुमितने मागील महिन्यात न्यू यॉर्कमध्ये झालेल्या यूएस ओपन स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये टेनिसचा महान खेळाडू रॉजर फेडरर याला प्रभावी चुरस दिली होती. सुमितच्या या खेळीने फेडररदेखील प्रभावित झाला होता आणि भारतीय खेळाडू खूप पुढे जाईल असे देखील म्हणत त्याचे कौतुक केले.