Official Theme Song for the Indian Olympic Team to Tokyo 2020 | PC: PIB Mumbai

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरण रिजीजू (Kiren Rijiju) यांनी ऑलिम्पिक दिनाच्या प्रसंगी, नवी दिल्ली येथे, टोकियो 2020 स्पर्धांना जाणाऱ्या भारतीय पथकाच्या अधिकृत संकल्पना गीताचा प्रारंभ केला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सचिव रवी मित्तल, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा, तसेच संघटनेचे महासचिव राजीव मेहता आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान यांच्यासह इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या ऑलिम्पिक संकल्पना गीताचे संयोजन आणि गीतगायन प्रसिध्द पार्श्वगायक मोहित चौहान यांनी केले असून त्यांची पत्नी प्रार्थना गेहलोत यांनी या गीताची शब्दरचना केली आहे.

संकल्पना गीताचा प्रारंभ करताना केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू म्हणाले की, “टोकियो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंना पाठींबा देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र यायला हवे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. अधिकृत संकल्पना गीताचा आज झालेला प्रारंभ हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक खेळांवर आधारित प्रश्नोत्तर चाचण्या, सेल्फी पॉईंट, वादविवाद स्पर्धा आणि चर्चा यासारख्या विविध उपक्रमांचा समावेश असलेल्या देशव्यापी #Cheer4India अभियानाची देखील सुरुवात केली आहे. भारताला वैभवशाली यश प्राप्त करून देण्यासाठी भारताचे दर्जेदार क्रीडापटू त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवत असताना, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक भारतीयाने पुढे यावे आणि या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन मी समस्त भारतीयांना करीत आहे.”

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बात्रा म्हणाले, “या संकल्पना गीताच्या प्रारंभप्रसंगी, मी आपल्या सर्व क्रीडापटूंना सांगू इच्छितो की हे फक्त प्रेरणादायक गीत नाही तर तुमच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या 140 कोटी भारतीयांच्या प्रार्थनांचा तो प्रतिध्वनी आहे. आणि मला असा दृढ विश्वास वाटतो आहे की, तुम्ही सर्वजण या स्पर्धांमध्ये तुमची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवाल आणि आपल्या देशाला यशाचे वैभव प्राप्त करून द्याल.”