सानिया मिर्जा झाली आई! चाहत्यांसाठी गोड बातमी
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (Photo Credits: Instagram)

टेनिसपटू सानिया मिर्जाआणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सानिया मिर्जा आई झाली असून, तिने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचे वृत्त आहे. नव्या पाहूण्याच्या आगमनानंतर सानिया आणि शोएबच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तर, दोघांचे चाहतेही भलतेच खूश झाले आहेत. आपल्या घरी लवकरच एक नवा पाहूणा येणार असल्याची माहिती सानियाने एका प्रतिक्रियादरम्यान काही दिवसांपूर्वीच दिली होती. स्वत: शोएब मलिकनेही ट्विट करुन सानिया आई तर आपण बाबा झाल्याची माहिती दिली आहे.

सानिया मिर्जाने १२ ऑक्टोबरला ट्विट करुन आपल्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती. या ट्विटमध्ये तिने म्हटले होते की, मी लोकांना एक सल्ला देऊ इच्छिते. (खास करुन पुरुषांना) ज्यांना असे वाटते की, प्रेग्नंट असणे याचा अर्थ आपण ९ महिन्यांसाठी हाइबरनेशनमध्ये जाणे. घरी बसणे.... लक्षात ठेवा जेव्हा एखादी महिला प्रेग्नंट होते तेव्हा आजारी नसते...'

दरम्यान, सानिया आणि शोएब यांचा १२ एप्रिल २०१०मध्ये विवाह झाला होता. भारतीय असून, पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न केल्यामुळे सानिया बरीच चर्चेत होती.