PKL 2021–22 Day 1: प्रो कबड्डीचा (Pro Kabaddi) 8 वा सीझन सुरू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी सीझन 8 चे तीन सामने खेळले गेले. यामध्ये यू मुंबा (U Mumba) आणि बंगाल वॉरियर्सने (Bengal Warriors) बाजी मारली. तर तमिळ थलायवास (Tamil Thalaivas) आणि तेलुगू टायटन्स (Telugu Titans) यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सीझन 8 च्या उद्घाटन सामन्यात बेंगळुरू बुल्स विरोधात यू मुंबाच्या 46-30 अशा विजयात अभिषेक सिंह (Abishek Singh) स्टार खेळाडू ठरला. यू मुम्बाच्या रेडरने सुपर 10 (19 गुण) जिंकले आणि सीझन 2 चॅम्पियन्सच्या विजयात संघाच्या बचावाने त्याला चांगला पाठिंबा दिला. पवन सेहरावतला विश्रांती देण्यात आल्याने बेंगळुरू बुल्स यांना सामन्यात चंद्रन रणजीत आणि पवनला पाठिंबा देण्यासाठी दर्जेदार तिसऱ्या रेडरची कमतरता जाणवली. यू मुंबाचा रेडर अभिषेक सिंहने सर्वाधिक 19 गुण मिळवले तर बेंगळुरू बुल्सचा कर्णधार पवन सहरावतने 12 गुण मिळवले. तसेच डिफेंडर नितेश कुमारच्या नेतृत्वात यूपी योद्धाने प्रो कबड्डी लीगच्या चालू हंगामात पराभवाने सुरुवात केली. 8व्या सत्राच्या पहिल्या दिवशी बंगाल वॉरियर्सकडून त्यांना 38-33 असा पराभव पत्करावा लागला.
प्रो कबड्डी लीगच्या चालू हंगामातील तिसर्या सामन्यात प्रदीप नरवालने यूपी योद्धा संघासाठी सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली. तर सुरेंदर गिलने 5 गुणांची भर घातली. दुसरीकडे, बंगाल वॉरियर्सकडून मोहम्मद नबीबख्सने 11 गुण, रेडर सुकेश हेगडे 8 आणि कर्णधार मनिंदर सिंहने 7 गुण मिळवून संघाचा विजय निश्चित केला. सामन्याच्या पूर्वार्धात चुरशीची स्पर्धा पाह्यला मिळाली आणि दोन्ही संघ 18-18 अशा बरोबरीत आले होते. तथापि शेवटच्या हाफमध्ये यूपीचा संघ 5 गुणांनी मागे राहिला. याशिवाय स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा दुसरा सामना चित्रपटापेक्षा कमी नव्हता. हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात चांगलंच अॅक्शन-ड्रामा पाहायला मिळाला. शेरेटन ग्रँड, व्हाईटफील्ड, बंगळुरू येथे खेळवण्यात आलेला हा सामना 40-40 ने बरोबरीत सुटला. एकवेळ तमिळ थलायवासने 9 गुणांची आघाडी घेतली होती पण टायटन्सनेही पराभव स्वीकारला नाही आणि उत्तम प्रकारे पुनरागमन करत सामना बरोबरीत सोडवला.
रेडर मनजीतने थलायवाससाठी सर्वाधिक 12 गुणांची कमाई केली आणि रेडर प्रपंजनने 6 गुणांची भर घातली. तासेक्ट तेलुगू टायटन्सकडून कर्णधार सिद्धार्थ देसाईने 11 आणि रजनीशने 6 गुण संघाला मिळवून दिले. उल्लेखनीय आहे की तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवास यांच्यातील सामना लीगच्या इतिहासात चौथ्यांदा बरोबरीत सुटला आहे. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये 8 सामने झाले, त्यापैकी 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.