यू मुंबा आणि पटना पायरेट्स (Photo Credit : Twitter)

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या सातव्या सत्रात शुक्रवारी म्हणजे आज (16 ऑगस्ट 2019) यू मुंबा (U Mumba) आणि पटना पायरेट्स (Patna Pirates) यांच्यात, 43 वा सामना खेळला गेला. अहमदाबादच्या एरिना बाय ट्रांसस्टेडिया येथे हा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र यू मुंबाने पटना पायरेट्स वर 34-30 गुणांनी विजय प्राप्त केला. यू मुंबाच्या वतीने अजिंक्य रोहिदास कापरे, मोहित बालियान आणि संदीप नरवाल, तर, पटना पायरेट्स कडून प्रदीप नरवाल, मोहम्मद इस्माईल मगशुदलू आणि सुरेंद्र नाडा यांनी उत्तम कामगिरी केली.

7 पैकी 3 सामने जिंकून मुंबाची टीम 8 व्या स्थानावर होती. तर पटना पायरेट्स दोन अंकांनी पिछाडीवर होती. या सामन्यात यू मुंबाच्या संघाने पूर्वार्धात चमकदार कामगिरी केली आणि 13 गुणांची वाढ करुन स्कोअर 22-9 पर्यंत नेला. दुसर्‍या हाफमध्येही संघाची कामगिरी चांगली राहिली आणि स्कोअरमधील फरक अजून कमी झाला. सामन्याच्या शेवटच्या रेडमध्ये पटना पायरेट्सकडे यू मुंबाला ऑल आऊट करत सामना जिंकण्याची संधी होती. पण मुंबईच्या रोहित बालियानने सुपर रेड करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. (हेही वाचा: बंगाल वॉरियर्सचा यू मुम्बा विरुद्ध 32-30 ने थरारक विजय, मागील तीन मोसमातील पहिला विजय)

सीझनमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये यू मुंबा संघाने चौथा विजय मिळवला आहे. आजच्या विजयासह संघ 23 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर गेला आहे. दुसरीकडे 8 सामन्यापैकी पटना पायरेट्सचा हा पाचवा पराभव आहे आणि गुणतालिकेत 16 गुणांसह संघ दहाव्या क्रमांकावर आहे.