दहीहंडी (Dahi Handi) हा अनेक तरुण आणि अबालवृद्धांच्या आकर्षणाचा खेळ. अलिकडेच त्याला साहसी खेळ म्हणूनही ओळखले जाते. पाठिमागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाऊ लागली. त्यातच प्रो गोविंदा लीग 2024 (Pro Govinda League 2024) ही तमाम मुंबईकर आणि दहीहंडी प्रेमींच्या उत्साहात भर घालते. ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 16 संघ सहभागी होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. डोम SVP स्टेडियमवर आयोजित, हा भव्य कार्यक्रम गोविंदा पथकांचे असामान्य कौशल्य आणि सहनशीलता दर्शवले. कृष्ण जन्माष्टमी-दहीहंडी उत्सवासाठी सज्ज झालेल्या गोविंदांचा साहसी अविष्कार उत्सवप्रेमींना लाईव्ह स्ट्रीमिंग (Pro Govinda League 2024 Live Streaming) द्वारे पाहता येणार आहे. प्रो गोविंदा लीग 2024 थेट प्रसारीत केले जाणार आहे.
स्पर्धेला जोरदार प्रतिसाद
प्रो गोविंदा लीग 2024 बाबत बोलताना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला स्पर्धेसाठी जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्यासोबत लीगचे संस्थापक आणि अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि लीग संचालक मजहर नाडियादवाला आणि मोहम्मद मोरानी यांच्यासह इतर प्रमुख अधिकारीही पत्रकार परषदेस उपस्थित होते.
तब्बल 25 लाख रुपयांचे भव्य बक्षीस
यंदाच्या वर्षी प्रो गोविंदा लीग 2024 मध्ये अनेक संघ सहभाही होत आहेत. यातील प्रत्येक संघ विजयावर दावा सांगणार आहे. मात्र, ज्यात प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्याच्या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की, विजेत्या संघास म्हणजेच गोविंदा पथकाला तब्बल 25 लाख रुपयांचे भव्य बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 15 लाख रुपये, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संघांना अनुक्रमे 10 लाख आणि 5 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. उर्वरित 12 संघांना लीग आयोजकांच्या सौजन्याने त्यांच्या सहभागासाठी प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.
गोविंदा पथकांसाठी सेवा सुविधा
स्पर्धेतील सर्व सहभागींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, लीगने सर्वसमावेशक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. ज्यात वैद्यकीय सुविधा, भोजन आणि गोविंदा संघांसाठी सराव जागा यांचा समावेश आहे. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने सर्व सहभागी गोविंदांसाठी विमा संरक्षण देऊन कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
लाईव्ह प्रक्षेपण कोठे पाहाल? हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत समालोचन
यंदाच्या लीगमध्ये 14,000 गोविंदांची नोंदणी झाली असून, एक लाख गोविंदा सहभागी होण्याची अपेक्षा आहे. हा कार्यक्रम स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. ज्यामुळे देशभरातील गोविंदा रसिकांना त्यांच्या आवडत्या संघांची कामगिरी पाहण्याची आणि आनंदाची संधी मिळेल. दरम्यान, गोविंदा लीग 2024 ही महाराष्ट्राच्या सर्वात प्रिय सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरांपैकी चिरस्थायी भावनेचा पुरावा आहे. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स फर्स्टवर दुपारी 4 वाजल्यापासून केले जाईल, ज्यात हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत समालोचन उपलब्ध आहे.
प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष आणि संस्थापक आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत ऍथलेटिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी लीगच्या भूमिकेवर भर देत म्हटले की, आमची दृष्टी संपूर्ण देशातील हजारो गोविंदांना प्रेरित करणे आहे. स्टार स्पोर्ट्ससोबत भागीदारी केल्याने आम्हाला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते आणि या लीगला नवीन उंची गाठता येते,असेही सरनाईक म्हणाले. लीगचे संचालक विहंग सरनाईक, मोहम्मद मोरानी आणि मजहर नाडियादवाला यांनी ही प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यास समर्थन दिले.