ओडिशा सरकारने (Odisha Government) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निपुण स्प्रिंटर दुती चंद हिच्या नावाची शिफारस केली आहे. गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कार जिंकलेल्या 27 खेळाडूंमध्ये 25 वर्षीय दुतीचा समावेश होता. तसेच ओडिशा सरकारने वेगवेगळ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी राज्यातील इतर पाच जणांनाही नामांकित केले आहे. दुतीने ट्विटरवर म्हटले की, “खेलरत्न पुरस्कारासाठी माझे नाव निश्चित केल्याबद्दल मी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभारी आहे. तुमचे आशीर्वाद माझ्यावर सदैव राहू द्या.” भारतीय हॉकीचे उप-कर्णधार वीरेंद्र लकडा यांना अर्जुन पुरस्कारासाठी, तर हॉकी प्रशिक्षक कालू चरण चौधरी यांना द्रोणाचार्य आणि माजी धावपटू व ऑलिम्पियन अनुराधा बिस्वाल (Anuradha Biswal) यांना ध्यानचंद पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
दुतीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर युवा स्प्रिंटरने गेल्या आठवड्यात पटियालाच्या इंडियन ग्रँड प्रिक्स 4 मध्ये 11.7 सेकंड्स घेत स्वतःचा 100 मीटर राष्ट्रीय विक्रम मोडला परंतु स्वयंचलित ऑलिम्पिक पात्रता वेळ 0.02 सेकंदांनी गमावली. तथापि, जागतिक रँकिंगच्या आधारे तिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. 2018 आशियाई स्पर्धेत 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर आता 25 वर्षीय चंदला गेल्या वर्षी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रदेश सरकारने नवोदित प्रतिभा ओळखण्यासाठी आणि राष्ट्रीय खेळ प्रोस्तान पुरस्कारासाठी KIIT डीम्ड विद्यापीठ आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन यांनाही नामांकन दिले आहे.
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी वार्षिक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत एक आठवड्याने वाढवून 5 जुलैपर्यंत केली आहे. मुळात अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत 28 जून होती. “नामांकन प्राप्तीची अंतिम तारीख 28 जून, 2021 पासून 5 जुलै, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे,” क्रीडा मंत्रालयाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती महासंघांसह बर्याच NSF ने आपले अर्ज पाठवले असताना, बीसीसीआय काही दिवसांत आपली यादी पाठवणे अपेक्षित आहे.