जगातील दिग्गज टेनिस स्टार (Tennis Star) सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) कोविड-19 लस (Coronavirus Vaccine) वादामुळे वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळू शकला नाही. यामुळे तो आपले विजेतेपद वाचवू शकला नाही आणि राफेल नदालने बाजी मारली. आता 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्याने लसीबाबत मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की कोविड लस घेण्यासाठी दबाव आणला गेला तर तो भविष्यात टेनिस स्पर्धा देखील सोडू शकतो. जोकोविचने म्हटले आहे की तो लसीच्या विरोधात नाही पण आपण आपल्या वैयक्तिक निर्णयाचे समर्थन करतो.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जोकोविचने ही माहिती दिली. या मुलाखतीत, जेव्हा जोकोविचला विचारण्यात आले की, लसीबाबतच्या भूमिकेमुळे तो विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनसारख्या स्पर्धांमधून माघार घेऊ शकतो का? यावर जोकोविच म्हणाला, ‘होय, ही किंमत मोजायला मी तयार आहे. मी कधीच लसीकरणाच्या विरोधात नव्हतो पण तुमच्या शरीरात काय जाते हे ठरवण्याच्या स्वातंत्र्याला मी नेहमीच पाठिंबा दिला आहे.’
तो पुढे म्हणाला, ‘जेतेपद मिळवण्यापेक्षा शरीराचे काय करायचे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. माझ्या शरीराबाबत निर्णय घेण्याचे तत्त्व कोणत्याही विजेत्यापदापेक्षा महत्त्वाचे आहे. मला माझे शरीर सुस्थितीत ठेवायचे आहे आणि त्यासाठी मी जे काही करू शकतो ते करेन.’
जोकोविचने बीबीसीशी केलेल्या संभाषणात सांगितले की, जर विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी कोरोनाची लस अनिवार्य केली गेली आणि त्याला लस घेण्याची सक्ती केली गेली, तर तो या दोन्ही ग्रँडस्लॅम सोडण्यास तयार आहे.
डिसेंबरच्या मध्यात कोविड-19 च्या अहवालाच्या आधारे जोकोविचला ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी वैद्यकीय सवलत देण्यात आली होती. मात्र, त्याच्या कोविडची लागण होण्याच्या वेळेवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावर जोकोविच म्हणाला, ‘मला टीका समजते आणि मी किती भाग्यवान आहे याबद्दल लोक बोलतात हे मला समजते. ऑस्ट्रेलियात ज्या प्रकारे गोष्टी संपल्या त्या माझ्यासाठी खूप निराशाजनक होत्या.’ (हेही वाचा: स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चे विजेतेपद केले काबीज)
जोकोविच अनेक दिवस ऑस्ट्रेलियात राहिला आणि त्यानंतर तो तिथून परतला. तो म्हणाला, ‘मला ऑस्ट्रेलियातून पाठवले गेले यामागे माझे लसीकरण न होणे किंवा मी व्हिसाच्या बाबतीत कोणतेही नियम तोडले, हे कारण नव्हते. या सर्व गोष्टी अप्रूव्ह झाल्या होत्या. मी ऑस्ट्रेलियातून हद्दपार झालो कारण इमिग्रेशन मंत्र्याने आपल्या शक्तीचा वापर करून माझा व्हिसा रद्द केला. कारण त्यांना असे वाटले की मी लसीकरणाच्या विरोधात आहे.’
अशाप्रकारे गेल्या महिन्यात, नोव्हाक जोकोविचने कोरोनाची लस घेतली नसल्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये भाग घेऊ शकला नव्हता. जोकोविच या महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपद्वारे कोर्टवर परतणार आहे. पुढील महिन्यात कॅलिफोर्निया येथे होणाऱ्या इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 च्या प्रवेश यादीत सर्बियाच्या या खेळाडूचे नाव आहे.