विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने मंगळवारी स्टेड डी फ्रान्स येथे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गट ब पात्रतेच्या पहिल्या प्रयत्नात 89.34 मीटर थ्रोसह पुरुषांच्या भालाफेकची अंतिम फेरी गाठली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजने आपल्या पहिल्या थ्रोमध्ये 84 मीटरचे पात्रता गुण मोठ्या फरकाने पार करून जेतेपदाच्या बचावासाठी चांगली सुरुवात केली. ही त्याची या मोसमातील सर्वोत्कृष्ट थ्रो देखील होती आणि सर्व गटांमध्ये अंतिम फेरीसाठी थेट पात्रता गाठणाऱ्या खेळाडूंमधील ही सर्वात मोठी थ्रो होती. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (हेही वाचा - Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी ठरला पात्र)
भालाफेक प्रकारातील फायनलचा सामना 8 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11:55 वाजता सुरु होईल. नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. नीरजसमोर रिपब्लिकच्या याकुब वाडलेच,पाकिस्तानचा अर्शद नदीम,जर्मनीचा ज्युलियन वेबर, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांचे आव्हान असणार आहे.
याआधी अ गटातील पात्रता फेरीत केनियाच्या ज्युलियस येगो आणि चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेज यांनी अनुक्रमे 85.97 मीटर आणि 85.63 मीटर फेक केली, ज्यामुळे त्यांना अंतिम फेरीसाठी थेट पात्रता मिळाली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनेही 87.76 मीटर फेक करून पात्रता गाठली. 2018 कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेता नीरज गुरुवारी (8 ऑगस्ट) ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.