सायना नेहवाल (Photo Credit: AP/PTI)

मलेशिया मास्टर्स (Malaysia Masters) बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजयासह भारतीय शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) क्वार्टर फायनलमध्ये पोहचली आहे. नेहवालने दुसर्‍या फेरीत 17 वर्षीय प्रतिभाशाली एन से यंगचा 25-23, 21-12 असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमध्ये 38 मिनिटं सामना रंगला. दोन्ही खेळाडू पहिल्यांदा आमने-सामने आले होते. सायनाचा क्वार्टर फायनलमध्ये सामना ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनशी (Carolina Marin) होईल. सायना आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये पहिल्या गेममध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. पण अखेरीस सायनाने शांत चित्ताने पहिला गेम 25-23 ने जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये सायनाने वर्चस्व कायम ठेवले आणि दक्षिण कोरियाच्या युवा बॅडमिंटनपटूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. यापूर्वी, बुधवारी सायनाने बेल्जियमच्या लायन टॅनला पराभूत केले आणि दुसरी फेरी गाठली. सायनाने टॅनला 36 मिनिटं चाललेल्या या सामन्यात 21-15, 21-17 ने पराभूत केले.

यावर्षी सायनाच्या खेळाने एक बदल दर्शविला, तिने सामन्यात बर्‍यापैकी वर्चस्व कायम ठेवले होते. सायनानंतर आता पीव्ही सिंधू (PV Sindhu), एचएस प्रणॉय (HS Prannoy) आणि समीर वर्मा (Sameer Verma) आपापले एकेरीतले दुसऱ्या फेरीतील सामने खेळतील. जगातील 26 व्या क्रमांकाच्या प्रणॉयचा सामना दुसर्‍या फेरीत जगातील पहिल्या क्रमांकाचा जपानचा केंटो मोमोटाशी (Kento Momota) होईल, जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

दुसरीकडे, या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पुरुष खेळाडूंनी निराश केले. पहिल्या फेरीत भारताचे तीन मोठे खेळाडू पराभूत झाले. परुपल्ली कश्यप याचा पहिल्या फेरीत जगातील पहिल्या क्रमांकाचा केंटो मोमोटा याच्याशी झाला ज्यात तो अपयशी राहिला. मोमोटाने 43 मिनिटांच्या सामन्यात कश्यपचा 21-17, 21-16 असा पराभव केला. किदाम्बी श्रीकांतलाही पहिल्या फेरीत निराशाजनक पराभव पत्करावा लागला. श्रीकांतचा सामना जगातील दुसर्‍या क्रमांकाचा चाओ टिएन चेनविरुद्ध झाला ज्याने त्याला अवघ्या अर्ध्या तासातच स्पर्धेतून बाहेर केले. साई प्रणितदेखील काही कमाल करू शकले नाही आणि डेन्मार्कचा रामुस गेमकेविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभूत होत स्पर्धेबाहेर पडला.