Ballon d'Or 2019: क्रिस्टियानो रोनाल्डो ला मागे टाकत बार्सिलोनाच्या लियोनेल मेस्सी ने रेकॉर्ड सहाव्यांदा जिंकला बॅलन डी ऑर पुरस्कार
लिओनेल मेस्सी (Photo Credits: AFP)

अर्जेंटिना आणि बार्सिलोना सुपरस्टार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी पोर्तुगाल आणि जुव्हेंटसच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि नेदरलँड्सच्या व्हर्जिन व्हॅन डिज्जाक याचा पराभव करून रेकॉर्ड सहाव्यांदा बॅलन डी ऑरचा (Ballon d'Or) पुरस्कार जिंकला. अमेरिकेच्या मेगन रेपिनो (Megan Rapinoe) हिने महिलांमधील हा पुरस्कार जिंकला. शेवटच्या वेळी अव्वल तीनमध्ये स्थान न मिळवणाऱ्या मेस्सीने चार वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकला. बार्सिलोनाबरोबर लिगा विजेतेपद मिळविणार्‍या अर्जेन्टिनाच्या या स्टार फुटबॉलपटूने 2009,2010, 2011, 2012 आणि 2015 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. दरम्यान, रोनाल्डोने 2008, 2013, 2014, 2016 आणि 2017 मध्ये हा पुरस्कार पाच वेळा जिंकला आहे. शेवटच्या वेळी क्रोएशिया (Croatia) आणि रियल माद्रिदच्या (Real Madrid) लुका मॉड्रिक याने या दोन स्टार खेळाडूंचे वर्चस्व मोडत हा पुरस्कार जिंकला होता. यावर्षी मेस्सीने फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचाही पुरस्कार जिंकला आहे. दुसरीकडे, लिव्हरपूलच्या व्हर्जिनला यूईएफएचा वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवडण्यात आले.

मागील 11 वर्षात मेस्सी आणि रोनाल्डोने मिळून 10 वेळा हा पुरस्कार जिंकला होता. पण, मागील वर्षी मॉड्रिकने त्यांचा प्रभुत्व मोडून पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला. यंदा, बार्सिलोनाचा स्ट्रायकर मेस्सी चॅम्पियन्स लीगमधील 34 वेगवेगळ्या संघांविरुद्ध गोल नोंदवणारा जगातील पहिला खेळाडूही ठरला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने बोरुसिया डॉर्टमुंडविरूद्ध गोल करून हा पराक्रम केला होता. मेस्सीच्यापूर्वी पोर्तुगालच्या रोनाल्डो आणि स्पेनच्या राऊलने 33 संघांविरुद्ध गोल केले आहेत.

दुसरीकडे, महिलांमध्ये मेगन रेपिनोने दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला. तिच्यापूर्वी नॉर्वेची एडा हेगरबर्ग हिने दोनदा हा पुरस्कार पटकावला होता. यंदाचे वर्ष रेपिनोसाठी उत्कृष्ट ठरले. तिच्यामुळे, अमेरिकेने दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकला. नेदरलँड्सविरुद्ध अंतिम सामन्यात अमेरिकेने 2-0 ने विजय मिळवला होता. यातील पहिला गोल रेपिनोने केला होता. या स्पर्धेत रेप्पीनोला गोल्डन बूट आणि गोल्डन बॉलही मिळाला होता. अमेरिकन खेळाडूला यंदा फिफा सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.