(Photo Credit: ANI Photo)

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ, आयटीएफने (ITF) सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) विरूद्ध भारताचा (India) डेव्हिस चषक सामना नोव्हेंबरपर्यंत स्थगित केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना इस्लामाबादमध्ये 14-15 सप्टेंबर रोजी होणार होता. आयटीएफने सांगितले की ते 'अपवादात्मक परिस्थितीमुळे' सामना पुढे ढकलत आहेत. आयटीएफने म्हटले आहे की, “स्वतंत्र तज्ज्ञ सुरक्षा सल्लागारांनी पाकिस्तानमधील सद्यस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर 14-15 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात डेव्हिस चषक एशिया/ओसियाना ग्रुप सामना इस्लामाबादमध्ये आयोजित केलेल्या सामन्याला पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे."

आयटीएफने म्हटले आहे की, "आयटीएफ पाकिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवेल आणि सामन्या संदर्भातील सुरक्षा परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी डेव्हिस चषक समिती पुन्हा बैठक घेईल."

भारत यापूर्वी पाकिस्तान खेळण्यास सज्ज होता पण भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकल्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. याआधी आयटीएफने भारताची सुरक्षा चिंता फेटाळून लावली होती. 1964 मध्ये भारतीय संघाने डेव्हिस चषकासाठी अंतिमवेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. शिवाय, 2017 पासून पाकिस्तान संघ पाचपैकी चार डेव्हिस सामने मायदेशात खेळले आहेत. कोरिया, थायलंड, उझबेकिस्तान व इराण हे संघ इस्लामाबादमध्ये सामने खेळले. परंतु हाँगकाँगने खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानला पुढे चाल देण्यात आली होती.