Mary Kom Birthday Special: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम बद्दल काही खास गोष्टी!
Mary Kom (Photo Credits: File Photo)

Mary Kom Birthday Special: भारतीय महिला स्टार बॉक्सर मेरी कोम (Mary Kom) हीचा आज 36 वा वाढदिवस आहे. 1 मार्च 1983 रोजी या स्टार खेळाडूचा जन्म मणिपूर येथे झाला. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या मेरी कोमने टीव्ही वर मोहम्मद अली यांची बॉक्सिंग पाहिला आणि बॉक्सर होण्याचे स्वप्न ती पाहु लागली. मात्र मुलीच्या या करिअर निवडीवर कुटुंबाकडून कडाडून विरोध झाला.

पण जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर मेरी कोम यशस्वी बॉक्सर झाली. इतकंच नाही तर 6 वेळा तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपला (World Championship) गवसणी घातली. 2012 मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑल्मपिंकमध्ये पात्र ठरणारी ती एकमेव भारतीय बॉक्सर होती. या स्पर्धेत मेरी कोमने कांस्य पदक पटकावले. 2014 मध्ये आशियाई गेम्समध्ये मेरी कोमने सुवर्णपदक जिंकले आणि हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

2001 मध्ये पहिल्यांदा बॉक्सिंग चॅम्पियनशीपला गवसणी घालणारी मेरी कोमला आतापर्यंत 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या विक्रमांनी देशाचा गौरव करणाऱ्या मेरी कोमचा 2003 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर 2006 मध्ये पद्मश्री आणि 2009 मध्ये सर्वोच्च खेळ पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने मेरी कोमला सन्मानित करण्यात आले.

2014 मध्ये मेरी कोमच्या आयुष्यावर आधारीत मेरी कोम या सिनेमा आला होता. उमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमात मेरी कोमची भूमिका प्रियंका चोप्राने साकारली होती. या सिनेमाने तब्बल 88 कोटींची कमाई केली होती.