
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (ITF) सोमवारी डेव्हिस चषकातील आशिया/ओशिनिया गट 1 अंतर्गत भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) टेनिस सामने पाकिस्तानातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (ITF) अखिल भारतीय टेनिस असोसिएशनची (AITA) विनंती मान्य केली आहे. सुरक्षा कर्णाचा हवाला देत भारताने डेव्हिस कपमधील पाकिस्तानविरुद्ध सामानाने दुसऱ्या, तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारताच्या विनंतीस मान्यता दिली आहे. आयटीएफच्या स्वतंत्र सुरक्षा पथकाने हा सामना पाकिस्तानमध्ये खेळू नये, असा सल्ला संघटनेला दिला होता. भारताच्या डेविस कप संघाचा कर्णधार महेश भूपती (Mahesh Bhupati) यांच्या नेतृत्वातील भारताच्या अव्वल खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये टेनिस मॅच खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला होता. दोन्ही संघातील हे सामने सप्टेंबरमध्ये खेळले जायचे होते, पण भारताच्या विनंतीनंतर नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
आयटीएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आयटीएफच्या स्वतंत्र सुरक्षा सल्लागारांच्या ताज्या सल्ल्यानंतर डेव्हिस समितीने निर्णय घेतला आहे की भारत-पाकिस्तानचा डेव्हिस कप एशिया/ओशिनिया ग्रुप 1 चा सामना तटस्थ ठिकाणी 29-30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांची सुरक्षा ही आयटीएफ आणि डेव्हिस कप समितीची पहिली प्राथमिकता आहे आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे." डेव्हिस कपच्या नियमानुसार पाकिस्तान टेनिस फेडरेशनकडेआता तटस्थ जागा निवडण्याचा पर्याय आहे आणि प्रस्तावित स्थळ ठरवण्यासाठीत्याच्याकडे 5 दिवसांचा कालावधी आहे. एकदा पर्यायाची माहिती दिल्यानंतर आणि ती मंजूर झाल्यानंतर नवीन स्थान निवडले जाईल.
पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा हे देशासमोर एक आव्हान बनले आहे. पाकिस्तानमध्ये सतत स्फोट होत असतात. जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करून दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याच्या भारताच्या निर्णया नंतर दोन्ही देशांमधील तणावात वाढ झाली. याच्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. यानंतर आयटीएफने सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.