फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा (FIFA World Cup 2022) अंतिम सामना रविवारी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी कतारमध्ये होणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या महान सामन्याकडे लागल्या आहेत. अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स (France and Argentina) यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाची इतिहासाच्या पानांमध्ये खास नोंद होणार आहे. आता प्रश्न आहे की, जिंकणाऱ्या संघातील खेळाडूंना किती बक्षिसाची रक्कम मिळणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिफा विश्वचषक 2022 च्या विजेत्याला $42 दशलक्ष म्हणजेच सुमारे 3 अब्ज 47 कोटी (347 कोटी) रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल.
दुसरीकडे, अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर दुस-या स्थानावर राहिलेल्या संघाला बक्षीस म्हणून सुमारे $30 दशलक्ष म्हणजेच सुमारे 2 अब्ज 48 कोटी रुपये मिळतील. तिसर्या क्रमांकाच्या संघाला बक्षीस म्हणून $27 दशलक्ष इतकी मोठी रक्कम देखील मिळेल. चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 25 दशलक्ष डॉलर्स मिळतील. ब्राझील, नेदरलँड, पोर्तुगाल, इंग्लंड या संघांनाही 17-17 दशलक्ष डॉलर्स मिळतील कारण या सर्व संघांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.
यूएसए, सेनेगल, ऑस्ट्रेलिया, पोलंड, स्पेन, जपान, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया या अंतिम 16 मध्ये पोहोचणाऱ्या संघांना 13-13 दशलक्ष डॉलर्स मिळतील. कतार, इक्वेडोर, वेल्स, इराण, मेक्सिको, सौदी अरेबिया, डेन्मार्क, ट्युनिशिया, कॅनडा, बेल्जियम, जर्मनी, कोस्टा रिका, सर्बिया, कॅमेरून, घाना, उरुग्वे अशा गट टप्प्यातील सामने खेळणाऱ्या संघांना प्रत्येकी 9 दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. (हेही वाचा: Mohammad Rizwan चे IPL आणि PSL वर बेताल वक्तव्य, त्याचे बोलणे ऐकून तुम्हालाही येईल हसू)
सध्या संपूर्ण फिफा विश्वचषकावर लक्ष ठेऊन आहे, कारण हा सामना अर्जेंटिनाचा कर्णधार आणि या खेळातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. त्याचबरोबर फ्रान्सचा स्टार खेळाडू एमबाप्पे त्याच्या दुसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. यापूर्वी फ्रान्सने 2018 फुटबॉल विश्वचषक जिंकला होता आणि एमबाप्पे देखील त्या संघाचा एक भाग होता.
दरम्यान, टी-20 (T20) विश्वचषक आणि आयपीएल यांसारख्या स्पर्धांशी फिफाची तुलना केल्यास, T20 वर्ल्डची एकूण बक्षीस रक्कम 45.68 कोटी रुपये आहे. आयपीएलची बक्षीस रक्कम फुटबॉल विश्वचषकातील 32 व्या क्रमांकावर असलेल्या संघापेक्षा कमी आहे. आयपीएल टूर्नामेंटमध्ये एकूण 46.5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. फिफाची एकूण बक्षीस रक्कम 3.6 हजार कोटी आहे. सर्वसाधारणपणे, क्रिकेट विश्वचषकाच्या बक्षीस रकमेपेक्षा ही रक्कम 80 पट जास्त आहे.