Carlos Alcaraz (Image Credit - Wimbledon Twitter)

नोव्हाक जोकोव्हिचचे (Novak Djokovic) विम्बल्डन (Wimbledon) ग्रँडस्लॅम स्पर्धेतील वर्चस्व अखेर स्पेनच्या 20 वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराझने (Carlos Alcaraz) संपुष्टात आणले आहे. अल्कराझने 2017 नंतर ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोव्हिचला नमवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि कारकीर्दीत पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. तसेच सेंटर कोर्टवर जोकोव्हिच 45 सामन्यांनंतर पराभूत झाला. विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अल्कराझने 23 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचवर 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय साकारताना कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले.  (हेही वाचा -  Sanjay Bangar आणि Mike Hesson यांच्याबाबत RCB ने घेतला मोठा निर्णय, दोन्ही दिग्गज फ्रेंचायझीच्या बाहेर)

नोव्हाक जोकोव्हिचने गेल्या चार विम्बल्डन स्पर्धांवर आपले एकहाती वर्चस्व राखले होते. तसेच त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचेच पारडे जड मानले जात होते. त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी साधण्याची संधीही होती. मात्र, अल्कराझच्या उत्कृष्ट खेळामुळे जोकोव्हिचची ही संधी हुकली. अल्कराझने पाच सेटमध्ये जोकोव्हिचचा पराभव केला आहे.

जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये अल्कराझची सव्‍‌र्हिस दोन वेळा तोडत 5-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याला पहिला सेट 6-1 असा जिंकण्यात यश आले. त्यानंतर मात्र अल्कराझने पुनरागमन केले. संघर्षपूर्ण झालेल्या दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझने टायब्रेकरमध्ये बाजी मारली. हा सेट साधारण दीड तास चालला. दीर्घकाळ चाललेल्या या सेटनंतर जोकोव्हिच दमलेला दिसला. तसेच तो काही वेळा कोर्टवर घसरला. त्याने तिसरा सेट 1-6 असा गमावला. मात्र, चौथ्या सेटमध्ये त्याने पुन्हा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला.  पंरतू पाचव्या सेटमध्ये अल्कराझने आपले वचर्स्व राखले.