Breakdance in Olympics: ब्रेकडान्सिंगला मिळाला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा; 2024 च्या पॅरिस खेळांमध्ये होणार समाविष्ट
Breakdancing Representational Image (Photo Credits: Unsplash)

क्रीडा जगातून एक चांगली बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) ब्रेक डान्सचा (Breakdancing) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुण दर्शकांना आकर्षित करून घेण्यासाठी आयओसीने हा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर ब्रेकडान्स व्यतिरिक्त स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग असे खेळही समाविष्ट करण्यात आले आहे. या खेळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव पॅरिस 2024 आयोजन समितीने दिला होता. ब्रेकडान्ससोडून इतर तीन खेळांचा समावेश टोकियो ऑलिम्पिकमध्ये होणार होता, जो कोरोना विषाणूच्या साथीमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला होता.

स्ट्रीट डान्ससारखे अर्बन इव्हेंट मोठ्या शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्केट-बोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग दिसणार आहे व 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेक-डान्सचा समावेश असेल. ब्रेक-डान्सिंग इव्हेंटला 'ब्रेकिंग' म्हणून ओळखले जाईल. 2018 मध्ये अर्जेटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रेक-डान्सला खूप पसंती मिळाली होती. युवा ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांनी, आयओसीसमोर हा खेळ समाविष्ट करण्याची शिफारस केली होती.

यासोबतच आता इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या समान असेल. टोकियो खेळांमधील महिला खेळाडूंची संख्या 48.8 टक्के आहे. पॅरिससाठी हे प्रमाण 50-50% केले जाईल. पॅरिस ऑलिम्पिकमधील मिश्र स्पर्धांची संख्याही वाढविली जाईल. टोकियो ऑलिम्पिकमधील मिश्र स्पर्धेची संख्या 18 आहे, जी 2024 मध्ये 22 पर्यंत होईल. आयओसीने टोकियोच्या तुलनेत पॅरिस क्रीडा स्पर्धांमध्ये पदक स्पर्धांची संख्या दहाने कमी केली आहे, म्हणजेच आता तेथे 329 पदकांचे आयोजन केले जाईल. टोकियो वेटलिफ्टिंगच्या चार श्रेणी कमी केल्या आहेत. यासह, 2024 मध्ये खेळाडूंचा कोटा 10500 असेल.

दरम्यान, 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी क्रिकेटचा समावेश करण्याबाबत चर्चा आहे. 24 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) या प्रकरणाबाबत बैठक होणार आहे.