BWF World Championship: साई प्रणीत याचा विक्रमी विजय, 36 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपची सेमीफायनल गाठत इतिहास रचला
साई प्रणीत (Photo Credit: @BAI_Media/Twitter)

भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू बी साई प्रणीत (B Sai Praneeth) याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या सेमीफायनल फेरीत मजल मारली आहे. 19 व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतने जगातील चौथ्या क्रमांकावरील इंडोनेशियन खेळाडू जोनाथन क्रिस्टीचा (Jonathan Christie) पराभव करून इतिहास रचला. शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात प्रणीतने क्रिस्टीला सलग सेटमध्ये 24-22 आणि 21-14 असे पराभूत करून 51 मिनिटांच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्क केलं. सोबत त्याने भारतासाठी आणखी एक पदकदेखील निश्चित केले. इतकेच नव्हे तर भारतीय बॅडमिंटनच्या 36 वर्षांच्या इतिहासातील विश्वविजेतेपदामध्ये पदक मिळविणारा प्रणीत दुसरा खेळाडू ठरला आहे. प्रणीतआधी प्रकाश पादुकोण (Prakash Padukone) यांनी 1983 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि भारतासाठी पदक जिंकले होते. (BWF World Championship 2019: पीव्ही सिंधू हीचा संघर्षपूर्ण विजय, Tai Tzu Ying हिला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश)

प्रणीतआधी भारताची स्टार पीव्ही सिंधू हिनेदेखील सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. सिंधूने चिनी तैपेई ताई त्ज़ू-यिंग (Tai Tzu Ying) हीचा तीन गेममध्ये 12-21, 23-21, 21-19 असा पराभव करत बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. यासह सिंधूने या प्रतिष्ठित स्पर्धेत तिचे पाचवे पदक निश्चित केले आहे. यापूर्वी तिने या स्पर्धेत दोन रौप्य व दोन कांस्यपदक जिंकले आहेत. सिंधूचा चीनच्या चेन यू फि आणि डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड यांच्यातील विजेत्यासह सेमीफायनल फेरीतील सामना होईल. सिंधूने 2017 आणि 2018 मध्ये रौप्य आणि 2013 आणि 2014 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाच्या यिंगविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामान एक तासा 11 मिनिटांत जिंकला. पहिल्या सेटमध्ये सिंधूला अवघ्या 15 मिनिटांत पराभवाचा सामना करावा लागला. पहिला गेम गमावल्यानंतर तिने दुसर्‍या गेनमध्ये विजयासाठी जोरदार पुनरागमन केले. शेवटच्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. एका वेळी चिनी खेळाडू आघाडीवर होती पण त्यानंतर सिंधूने शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट खेळ दाखविला आणि सेटसह गेमही जिंकला.