रोजर फेडरर, लिएंडर पेस (Photo Credit: Twitter/Getty)

भारताचा अनुभवी लिअँडर पेस (Leander Paes) आणि त्याची जोडीदार येलिना ओस्टापेन्को (Jelena Ostapenko) यांचा मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open) प्रवास मंगळवारी संपुष्टात आला. पेस आणि लॅटव्हियाच्या ओस्टापेन्कोच्या जोडीला ब्रिटनचा जेमी मरे (Jamie Murray) आणि अमेरिकेची बेथानी मॅटेक सँड्स (Bethanie Mattek Sands) यांनी 6-2, 7-5 असे सलग दोन सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीतील सामना एक तास आणि सात मिनिटं चालला. पेसने सुरुवातीला 2020 हे व्यावसायिक सर्किटवरील त्याचे शेवटचे वर्ष असेल अशी घोषणा केली होती. रोहन बोपन्ना आता विजेतेपदाच्या शर्यतीत एकमेव भारतीय म्हणून कायम आहे. पेस आणि ओस्टापेन्कोने सलामीच्या फेरीत मार्सेलो मेलो आणि बार्बोरा स्ट्रीकोव्हाला यांचा 3-6 6-4 10-7 ने पराभव केला, मात्र दुसऱ्या फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. (Australian Open 2020: सानिया मिर्झा ने मिश्र-दुहेरीनंतर महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतून घेतली माघार)

दुसरीकडे, 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रोजर फेडरर (Roger Federer) मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. फेडररने 5 सेटच्या सामन्यात अमेरिकन टेनिस सँडग्रेनचा 6-6, 2-6, 2-6, 7-6 (8), 6-3 असा पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी फेडररला भरपूर मेहनत करावी लागली. सात मॅच पॉईंट्स वाचवून त्याने अमेरिकन खेळाडूविरुद्ध 5 सेटच्या थरारक सामन्यात विजय मिळवला. फेडररने 15 व्या वेळी या चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम वेळी तो अंतिम 4 मध्ये 2018 च्या स्पर्धेत पोहचला होता. 100 व्या क्रमांकावर असलेल्या सँडग्रेनने सामन्यात चांगली कामगिरी करत वर्ल्ड नंबर 3 फेडररला 3 तास 31 मिनिटांसाठी खेळायला भाग पाडले. दरम्यान, सँडग्रेनला दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रभावाचा सामना करावा लागला आहे.

पुरुष एकेरीचा दुसरा उपांत्यपूर्व सामनाही आज होणार आहे. यामध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि कॅनडाचा मिलोस राओनिच आमने-सामने येतील. या सामन्यातील विजयी खेळाडू उपांत्य फेरीत फेडररविरूद्ध खेळेल. शिवाय, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची अ‍ॅश्ले बार्टीने स्पर्धेच्या महिला एकेरीत उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला आहे. बार्टी 36-वर्षांत उपांत्य फेरी गाठणारी ऑस्ट्रेलियन प्रथम महिला खेळाडू ठरली. बार्टीने गेल्या वर्षीची झेक प्रजासत्ताकची उपविजेती पेट्रा क्विटोवाचा 7-6, 6-2 असा पराभव करून अंतिम 4 मध्ये प्रवेश केला.