भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने (PV Sindhu) ऑल इंग्लंड ओपनमध्ये (All England Championships) विजयासह सुरुवात केली आहे. सिंधूने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या बेईवेन झेंगचा 21-14 21-16 असा पराभव केला. दोन्ही खेळाडू दहाव्यांदा आमने-सामने आले होते. गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून सिंधू खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने फ्रेंच ओपन आणि यावर्षी जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन मालिका भारताच्या या स्टार शटलरसाठी खूप महत्वाची ठरली आहे. दुसरीकडे चीनच्या चेन लॉन्गने श्रीकांत किदाम्बीचा (Srikanth Kidambi) 21-15 21-16 असा पराभव केला. भारतासाठी सायना नेहवालचा (Saina Nehwal) पराभवही धक्कादायक ठरला. यामुळे तिला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवणे अधिक कठीण बनले आहे. भारतासाठी हा मोठा धक्का आहे कारण यापूर्वी सात खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक क्रमवारीतील तिसर्या क्रमांकाच्या जपानची अकाने यामागुचीविरुद्ध सायनाला अवघ्या 28 मिनिटांत 11-21 8-21 ने पराभवाला समोरे जावे लागले.
46267 गुणांसह सायना बीडब्ल्यूएफ क्रमवारीत 20 व्या स्थानावर आहे आणि 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाला टोकियो स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी 28 एप्रिलच्या कट ऑफ तारखेपर्यंत अव्वल 16 मध्ये स्थान मिळवायचे आहे. ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी सायनाला काही चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे. सायना येत्या काही आठवड्यात स्विस ओपन, इंडिया ओपन आणि मलेशिया ओपनमध्ये भाग घेणार आहे.
पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने पहिल्या लढतीत हाँगकाँगच्या च्युक यू लीला 17-21 21-8 21-17 असे पराभूत केले आणि पदार्पणाच्या सामान्यत विजयी सुरुवात केली. सेनला आताउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी दुसरे मानांकित आणि जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असलेला डेन्मार्कचा विक्टर अॅक्सलसेनचा सामना करावा लागणार आहे. श्रीकांतनंतर पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानी असलेल्या साई प्रणीथलाही पराभव पत्करावा लागला. प्रणीथ अवघ्या 33 मिनिटांत 12-21, 13-21 ने 36 व्या क्रमांकावर असलेल्या चीन शटलरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.